एक सुंदर आळस देऊन मी जिन्यातून खाली उतरतो.
रिकामं, वैयक्तिक माझं असल्यासारखं वाटणारं चहाचं दुकान. नेहमीचं.
चहा. दिवसाची सुरुवात.
अडीच रुपयात फार कमी गोष्टी अलिकडे अशा जिंकून जातात.
रेडिओवर आशाबाई, समोर चहा. जरा नजर उचलून समोर रस्ता.
रस्त्यावर एक मुलगी दिसते.
पुष्कळाच.
नेमाड्यांचे आभार मानत मी तिच्याकडे पाच सेकंद बघतो.
चहा संपतो. आशाबाईही थांबतात.
आता 'भिकारी' हा माणूस आपल्याला नवीन नाही.
चहाचे पैसे दिल्यावर समोर दोन सुंदर घाणेरडी मुलं येतात.
एक आठ-दहा वर्षांचा मुलगा आणि त्याच्याहून किंचित लहान वाटणारी एक मुलगी.
तिच्या खांद्यावर परिपूर्ण विटलेली एक झोळी.
हातात एक वाळलेला, धूळ चढलेला बुके.
पैसे मी देणार नसतोच.
ती नेटाने माझ्या मागे.
मला दया येतीय, पण माझा नकार कायम.
माझा नकार आणि तिचा हट्ट कायमच.
मी माझ्या गाडीपाशी येतो.
अचानक पाठीवर एक फटका बसतो आणि मी चमकून मागे बघतो.
ती मुलगी थरथरत उभी.
पुन्हा एकदा ती मला हातातल्या बुकेने मारते.
मी चकित होऊन तिच्याकडे बघत राहतो.
तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग नाही. पण चेहरा निर्विकारही नाही.
गंमत म्हणजे मला बऱं वाटू लागतं. तिला जवळ घ्यावसं वाटू लागतं.
इतक्यात ती वळून चालू लागते.
तरातरा चालत ती आणि तो मुलगा निघून जातात.
मी उभाच. शून्य.
पण मग मी मनात थोडंसं हसतो.
वाटतं, तिने हे मला मारलं, पण ते डार्विनलाही लागलं असणार.
कुटुंबव्यवस्थेच्या एखाद्या मजबूत खांबालाही लागलं असणार.
नियोजन मंडळाच्या सदस्यांनाही लागलं असणार.
आणि त्यांनाही नक्की बरं वाटलं असणार.
माझ्या सारखंच.
फुकटात इतकं समाधान अलिकडे फार क्वचित मिळतं.