संध्याकाळ

क्षितिजावर उतरते ऊन

वाहतो किनारा अन् डोलते रान

तिच्या पायात अंधार पैंजण

सलज्ज मनी प्रकाश गोंदण.

ती वाऱ्याचे स्वप्न भाषण

अनाम प्रेमिकाची हुरहूर

ती मातीची धवल गाथा

करुण निःश्वासांची बहर कथा.

सुष्ट मनाचे आर्जव ती

लाघवी कोपिष्ट ललना ती

उधळत जाई गंध फुलांचा

परी वेचिते निर्माल्य ती.

सुप्त प्रलय तिच्या पोटी

गीत सृजनाचे तिच्या ओठी

सजवते निखारे देहभर

शिंपते चांदणे वाटेवर.

ओंजळीतले चैतन्य ती

दृष्टीइतके समाधान ती

थकलेले नभ पांघरते

अन् विलयाला आलिंगन देते.