चंगळ

वातानुकूलित प्रशस्त महादालन
प्रत्येक कोपरा...प्रत्येक चेहरा - भरजरी
रेशमी वस्त्रं, धूप, हार, तोरणं...
मंचावर जगद्गुरुंनी मांडलेला सुबकसा महायज्ञ
विश्वशांती, विश्वकल्याण ई.ई. साठी.
शेकडो टापटीप भाविक तल्लीन भिंतींवरच्या प्लाझ्मा प्रक्षेपणात.
बाहेरच्या बाजूला -
कार्यकर्त्यांची सुनियोजित धावपळ,
यज्ञाच्या समाप्तीची वाट पहात असलेल्या सुग्रास भोजनाचा दरवळ आणि
grant, ben franklin अशा महाभागांनी भरलेली
या अध्यात्मिक खाजगी महाविद्यालयाची देणगीपेटी.
मी -
माझ्या अघळपघळ घरगुती अवताराकडे दयार्द्र निराशपणे बघणार्‍या २-४ नजरा शिताफीने टाळल्या,
आणि, उच्चभ्रू भगवद्कृपेपासून वंचित असलेल्या माझ्या दैनंदिन झटापटीकडे निमूटपणे वळलो.
आश्चर्य वाटलं आणि थोडं समाधानही...
ही अध्यात्मिक चंगळ माझ्या खिशाला आणि मनाला परवडत नाही... अजूनही, अजूनतरी.

-- पुलस्ति.