शारदेच्या मंदिरी

शारदेच्या मंदिरी ह्या
गातात कैक कोकिळ गाणी
वसंताच्या आगमाची
डवरल्या डोहाळतेची
ऋतूंच्या सार्थकतेची
सावळ्या पोटुशी मेघांची
पावसाची
श्रावणाच्या हिरवळीची
शरदशीतल चांदण्यांची

रक्तात वाहे ज्यांच्या ग्रीष्मदाह
तहान होऊन, भूक होऊन
अतृप्त, अव्यक्त, आसक्त
त्यांचे बोल मात्र वर्ज्य
त्यांचा भेसूर खर्ज
विटाळेल राऊळाला

इथे हेमंतास परवानगी आहे बोलण्याची
केवळ पानगळीच्या अश्रुपातातून
आणि मुका आहे
गोठलेला शिशिर
थिजलेल्या बर्फाळ गात्रांचा

या गाभ्यात प्रवेश आहे फक्त
सनईच्या मंगल शार्दुल विक्रीडितात गाणाऱ्या
वज्रचुडेमंडित सवाष्ण प्रतिभेस
मज्जाव आहे
सौंदर्यास पाहून सहज उमटणाऱ्या
उनाड, छचोर, बेसूर, छंदहीन शिट्टीस
(जी कधी कधी अधिक सच्ची, उत्स्फूर्त असते)