...आता नको!

आमचे प्रेरणास्थान : प्रदीप कुलकर्णी यांची सुंदर गझल ...आता नको!

नको, डान्सचा बार आता नको
पुन्हा तोच झंकार आता नको

नका साथ नेऊ कुणीही मला
मजा ती मजेदार आता नको

हसू येत आहे अटीचे तुझ्या -
"मुलांचा मला भार आता नको!"

मला प्यार आहेत साऱ्याजणी
अशा दोन वा चार आता नको!

स्वतः: मीच जेथे वळू व्हायचो
असा बैलबाजार आता नको!

गटारीस मजला असे वाटते
गळा कोरडा फार आता नको

नको डासविश्वातले हे जिणे...
नि हिवताप आजार आता नको!

मुक्याचाच भारी मला सोस तो
तुझी त्यास तक्रार आता नको

तुझी वेळ होताच खाशील तू
अवेळी फलाहार आता नको!

तुझा बाप होकार देईल हे
खुळे स्वप्नसंभार आता नको!

गळेखाजव्यांनो कृपा ही करा!
गळ्यातून गंधार आता नको!

करी खोडसाळा विडंबन असे
कुणाचीच तक्रार आता नको!