वणवा २

मिलिंद फणसे यांच्या अंतरी पेटलेला "वणवा" वाचला आणि आमच्या तथाकथित प्रतिभेनेही पेट घेतला. ("एव्हढी
काय घाई झाली आहे लिहिण्याची? काहीतरी वाचता आणि बुडाखाली आग लागल्यासारखे
करता!मी एखादं काम सांगितलं तर वेळ नसतो तुमच्याकडे. इथे मी मात्र मर,मर,
मरत्येय...
" इति सौ. पुढील 'सं'भाषण साऱ्यांना पाठ असल्यामुळे देत नाही.)

जोगवा लक्ष्मीकृपेचा मागतो आहे
सर्व धन घोड्यावरी मी लावतो आहे

रोज मागे वंदनेच्या लागतो आहे
एक डोळा शर्वरीवर ठेवतो आहे

होय, सर्वांशी जरी मी बोलतो हसुनी
खास कोणा एकटीला गाठतो आहे

तीच फुंकर घालते अन्‌ दीप मालवते
आणि वर म्हणते "कशाला पेटतो आहे?"

वाहते देवा फुले पत्नी दिवस-रात्री
अन्‌ उशी नवरा तिथे कवटाळतो आहे

व्यसन मटक्याचे मला आहे असे जडले
लागला नाही कधी पण लावतो आहे

हाय ते पार्ट्यांस जाणे संपले सारे
फक्त दुपट्यांच्या घड्या मी घालतो आहे

मार्ग कैसे वेगळे होतील दोघांचे?
पोटगीचा आकडा भंडावतो आहे!

कोरडे डोळे निरोपाच्या नको वेळी
चोरुनी ग्लिसरीन आधी घालतो आहे