हातात राहिले केवळ पोकळ शब्द!

ही विरली शाई, पत्र पुसटसे झाले
या अक्षरातले वळण जरा फिसकटले
तो मुळी दिसेना निळा ठसा बोटांचा
अन् कोपऱ्यातले अश्रुबिंब ते इवले

मज अजून दिसतो याचा लिहिता हात ...
जणु रेखित होता माझा ललाटलेख
कापला जरा तो थरथरला , अडखळला
अक्षरी उमटला हृदयाचा आलेख

वाचले कितीदा ते हृदयीचे बोल
होता जडलेला जिवाआगळा छंद ...
ते आज अचानक पुहा लागता हाती
हातात राहिले केवळ पोकळ शब्द!

-संपदा
(१०. सप्टेंबर २००७)