पुन्हा जन्मलो. पण जन्मतःच मी कुणाला तरी नकोसा झाला होतो. तान्हा असतानाच कोणीतरी माझ्यावर चाकूचे वार करुन मला कचरापेटीत टाकून दिलं! जन्मताच पेपरांत फोटोबिटो छापून आले म्हणे. नंतर एका गरीब, निपुत्रिक जोडप्यानं मला प्रेमाने वाढवलं.
चार-पांच वर्षांचा असेन, आमच्या घराजवळ खेळत होतो. तिथे बरेच दिवस एक मशीन आणून कशाला तरी खोदत होते. खेळता खेळता जवळ गेलो आणि डोकावलो त्यांत. कांही कळायच्या आंत पडलो. कितीवेळ आंत पडून रडत होतो. बाहेर खूप गोंगाट ऐकू येत होता. दोन दिवसांनी मला बाहेर काढलं. आई मला जवळ घेऊन रडत होती. टीव्हीवर मला सारखं दाखवत होते असं आई म्हणत होती.त्यानंतर आईने मला फार जपलं. स्वतः उपाशी राहिली पण मला खाऊ घातलं. पोरगं आंत पडून चार वर्ष झाली तरी सरकारकडून पैसे आले नाहीत असं वैतागाने बडबडत असल्याचं आठवतं.
एक दिवस दूरचा मामा आला. बापाला म्हणाला, तुझं लेकरु तुडतुडीत आहे, चांगलं धावेल अन धावलं तर चिक्कार पैसे मिळतील. त्यानं माझा ताबाच घेतला. फार हाल व्हायला लागले. रोज उठुन लांबवर धांवायचं! धावलं तरच जेवायला मिळायचं. कधीकधी तर धावतानाच चक्कर यायची. हळुहळू धावण्याची संवय झाली. पेपरांत नांव यायला लागलं, टीव्हीवाले येऊन काहीबाही विचारु लागले. पण मामा जास्त बोलुच द्यायचा नाही. तोच उत्तर द्यायचा. शेवटी एक दिवस त्याचं बिंग फुटलं. मग गांवकऱ्यांनी त्याला दिलं हाकलून.
मी फार कंटाळून गेलो होतो. आधीच गरिबी, त्यांत ही जगावेगळी संकटं! तसाच वयानं वाढत गेलो.खाण्याचीच मारामार तिथे शिक्षण कुठलं ? जमेल तेवढे दिवस बापाने शाळेत पाठवलं. उनाड पोरांची संगत लागली. आईबाप म्हातारे झाले , त्यांची कमाई आटली. उपाशी किती दिवस रहाणार ? चोऱ्यामाऱ्या करायला शिकलो. एक दिवस सायकल चोरताना पकडला गेलो. लोकांकडून सपाटून मार खात होतो. मारणं थांबतच नव्हतं. तिथेही टीव्हीवाले कडमडले होते. शेवटी एक हवालदार मोटरसायकल वरुन येताना दिसला. हात जोडून त्याच्या पायाशी लोळण घेतली. वाटलं, कसा देवासारखा आला, हा तरी वाचवेल! पण त्याने मला दोराला बांधून मोटरसायकल मागे फरपटवलं हो! अंगाची सालटी निघाली. पुन्हा एकदा पेपरांत फोटो!
मग मात्र मी या जगालाच कंटाळलो. किती हाल सहन करायचे ? या सगळ्या निर्दय जगाचा सूड घ्यावासा वाटू लागला. तशी संधीही लवकरच चालून आली. आमच्या गँगमधला एकजण मला हॉटेलात घेऊन गेला. भरपूर खाऊपिऊ घातलं. म्हणाला, तुला जगाचा, लोकांचा सूड उगवायचा आहे ना ? मग माझं ऐक. आपल्यासारख्यांची ही अवस्था कोणामुळे झाली आहे ? या नेतेमंडळींमुळे! आपल्या भागातले नेताजी येणार आहेत गांवात! तर मी सांगतो तसं कर, मग तुला चिक्कार पैसे मिळतील! मी म्हटलं, मला तर जगायचीच इच्छा उरली नाहीये.
तो हंसला, म्हणाला, मग तर आणखीनच सोप्पं! तुझ्या कपड्याखाली आम्ही काही बांधू. तू फक्त गर्दीत घुसून नेताजींच्या जवळ जायचं. पुढचं सारं आम्ही बघून घेऊ. तुझ्या आईबापांना भरपूर पैसे मिळतील. मी तयार झालो.
समारंभाच्या दिवशी नेताजी आले. भाषणं झाल्यावर बांबूपाशी येऊन सगळ्यांना नमस्कार करायला लागले. मी संधी साधून मुसंडी मारली गर्दीत, ते जवळ येण्याची वाट पाहू लागलो. अचानक मागून मानेवर एक वजनदार हात पडला. कोणालाही न कळता मला घेऊन गेले. मार सुरु होण्याची वाट पाहू लागलो. पण कोणी जवळच येईना! मग पांढऱ्या कपड्यातली डोक्यावर कांचेची उलटी हंडी बसवलेली माणसं आली. त्यांनी अंगावरचं सगळं उतरवलं. ते बाजुला झाल्याबरोबर मात्र हवालदार मंडळी तुटून पडली.
कोर्टाच्या वाऱ्या सुरु झाल्या. बरोबरचा हवालदार म्हणायचा, तुझं आयुष्य वाढलं लेका! बाहेर गरीबीनं मेला असतास. आता सरकारच तुला दहा वर्ष पोसेल. तुझ्याबरोबर बड्या घरची पोरं आहेत. त्यामुळे दहाची वीस वर्ष सुद्धा होतील.
एक दिवस दुसऱ्या गांवच्या कोर्टात जायचं होतं. मध्येच घाटांत जीप थांबली. मला उतरायला सांगितलं. म्हणाले, पळ लेका, सरकारने तुला सोडलंय. मी तसाच उभा! एक दांडका बसल्यावर धांवत सुटलो. चार पावलं धावलो असेन, तितक्यात कानामागे आवाज आला अन कोसळलो.
नंतर एकदम भान आलं तर मी देवाच्या दरबारात !!!