'पुन्हा कधी' म्हणता म्हणता निसटून जाते सुख... बघ
आयुष्याचे बघता बघता बदलून जाते रूप... बघ !
गच्च मुठीत धरले तरी भुरभुरणाऱ्या वाळूसारखे
'हाती काहीच आले नाही!' लागते रुखरुख... बघ !
डोंबाऱ्याच्या ढोलकीवर पाऊल धरिते अपुला ताल
खोल दरीची मनात भीती कधी साठते खूप... बघ !
'जोडायाचे.... तोडायाचे'... ठरले नसते गणित कधी
सांधायाचे तुटके धागे, कधी 'छाँव', कधी 'धूप'... बघ !
दैव घालते घाला आणिक भाळ हासते उदास होऊन
'घडते जे... ते अपुले प्राक्तन!' म्हणत राहावे चूप... बघ !