तोडीलेस तू बंध मनाचे
जपल्या परि मी जुन्या खुणा
रुजलेल्या त्या स्वप्नबीजाचे
रोप विखुरले कसे कळेना..
आले होते तुझेच ते स्वर
हाकारीत मज पुन्हा पुन्हा
गहिवरलेल्या मुकेपणाला
फुटे पालवी, कोंब नवा..
सर्वस्वाने प्रित उधळली
समर्पूनी मी तनामना
कळले नाही कधी अचानक
ऊन पसरले चहुबाजूंना..
तरीही येतो गंध फुलांना
सांज दरवळे तुझ्याचपाशी
उजळूनी येते मनोमंदिरी
तुझी सावली हळूवारशी..
गेले क्षण, त्या आठवांसवे
बहरून येते मनी चांदणे
कातरवेळी भरल्या नेत्री
ओठांवरती मुके तराणे.........
शीला