सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेउ द्या
दुनिया ओशाळ वाळवंट
इथल्या सावलीत जरा बसू द्या
सर तुमच्या तासाला
तसंच मुद्दाम शिंकू द्या
डस्टरचा नेम मात्र
तुम्ही तसाच चुकू द्या
सर तुमच्या छळ्यांनी
हातांवरच्या दिसल्या रेषा
तेच हात घेउन आलोय
अजून थोड्या छळ्या द्या
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेउ द्या
आबाधाबी,लगोरी,लंगडी
चिलम-तंबाखू , खोखो , दुंडी
सर इथल्या झाडांखाली
पुन्हा ओलिंपीक भरू द्या
चपलेची बॅट अनं खड्याचा बॉल
सर तो काडीचा फुटबॉल परत द्या
शुन्यात समाधान शोधण्याचा
प्रयत्न पुन्हा करू द्या
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेउ द्या
सर तुमच्या साठी शाळा ही
पण हे आमचं घर होतं
दिसायला भिंती विटांच्या
त्यांच्यात ओतलं प्रेम होतं
घरटं सोडलं पिलांनी,
घरपण मात्र सुटलं नव्हत
पंख फुटले पिलांना
पंखातलं बळं तुमचंच होतं
सर चोचीत दाणें नकोत
अजून थोडं प्रेम द्या
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेउ द्या
बेंचवर कोरलेलं माझं नाव
अनं तुमचं चित्रही तसच असेल
पाठीवर फुटलेलं तुमचं घड्याळ
अनं तुमचंही काचेचं मन असेल
बेंचमधल्या फटीत सर
कॉपिचं तुकडं अजून असेल
मॅडमनी 'आई' शिकवतांना
ओघळल्या थेंबांच मीठ असेल
संक्रांतिचं तीळ उष्ट
राखिचं तुटकं धागं असेल
कोवळं तेव्हाचं बुच्याचं फुल
आत्ता कोणाच्या प्रेमात असेल?
देवाशप्पथ सांगतो सर,
देवाशप्पथ सांगतो सर
माझ्यासारखचं तडफडणारं
नुसत्याच आठवणी गिळणारं
एक तरी वेडं मन असेल
सर असल्या आठवण वेड्यांची
जत्रा पुन्हा जमवू द्या
'आठवण-अमृत' , 'साठवण-शाळा'
घागरी आमच्या ओसंडू द्या,
सर, आपल्या शाळेत पुन्हा एकदा प्रवेश घेउ द्या
दुनिया ओशाळ वाळवंट
इथल्या सावलीत जरा बसू द्या
सर, आपल्या शाळेत मला
पुन्हा प्रवेश घेउ द्या.