ऽनदीची एकच कविता दोन स्वरूपात...
नदी : १
संथ वाहणारी एक नदी
फाटा फुटला एक
तिच्यातून
अन गेला लां ऽ ब
नंतर झाला समांतर
अन म्हणाला मी दुसरी नदी
नदी म्हणाली ब ऽ र
आणि वाहत राहिली त्याच
सं थ ल यी त
दुसऱ्या नदीने
उड्या मारल्या
या द ग डा व रू न त्या द ग डा व र जाताना
उगीचच थोडी ख ळ ख ळ केली
मध्येच गिरक्याही घेतल्या -
पहिली नदी संथपणे
वाहतच होती
मग दुसरी नदी कंटाळली
पुन्हा वळत वळत
येऊन मिसळली पहिल्या नदीत
आणि दोघी मिळून
संथपणे
वाहतच राहिल्या.....
-----------------------------------------------------------------------------------
नदी : २
संथ वाहती एक नदी
फुटला फाटा तिच्यामधून
म्हणे आपुला मार्ग निराळा
तसाच गेला दूर निघून
पुढे जाउनी होई समांतर
दोघांमध्ये वाढे अंतर
पहिली राही संथ प्रवाही
दुसरा वेगे धावत राही
दगडादगडांवरुनी फिरुनी
उगाच थोडी खट्याळ खळखळ
मधेच गिरकी स्वतः भोवती
आणिक हवी-हवीशी भोवळ
धाव धावुनी कंटाळुनी मग
पुढे जाउनी परत वळे
मग पहिलीच्या शांत प्रवाही
शांतपणे तोही मिसळे