प्लास्टिकच्या या निळ्या सागरी
भगभगती धुरकट उमटे रेघ
कुठुनि येसी कुठवर जासी
कुणास्तव घेसी हा प्रचंड वेग॥
काळोखाचे अस्तर फाटे
मोडका झिपर उघडी चेन
काळेकुट्ट हे भविष्य लिहिण्या
जलरंगाचे सरसावे पेन॥
तळपत झळकत उल्का सरके
ज्ञाताचे ओलांडुनि कुंपण
मूढ मतीच्या मेंढ्यांच्या या
तोंडाला देशभक्तीचे लिंपण॥
अजुनि आणतो पहाटवारा
श्रांतक्लांत ग्लानीची पेंग
फोडफोडुनि अति जरि दमलो
एक तरीही उरली शेंग॥