पुन्हा मी

जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने पाहिल्या की वेगळ्या वाटतात का? गोष्टी बदलतात की आपण बदलतो? कदाचित संदर्भ बदलतात.
तेच रस्ते, त्याच गल्ल्या, तीच माती, तीच धूळ पण कदाचित तोच नसलेला मी.
लबाड मांजरासारखा मी डोळे मिटून राहिलो
समोरचं दूदू गटागटा प्यायलो.
मांजरं मूर्ख असतात, त्यांना वाटतं कुणीच त्यांना पाहत नाही.
पण खरंच मला कुणीच पाहत नाही
कारण आजूबाजूला सगळीच मांजरं आहेत,
डोळे मिटून दूदू पिणारी
त्यांनाही वाटतं त्यांना कुणीच पाहत नाही
आणि खरंच कुणीही पाहत नसेल, कारण इथे सगळीच लबाड मांजरं आहेत.

पण मी मात्र माझा वेगळा बाणा दाखवतो
हळूच पापणी किलकिली करून एका डोळ्याने पाहातो.

दिसतात मला साजरे नसलेले डोंगर
कसे बरं दिसले होते स्वप्नात? स्वप्नवत

अचानक समोरचा सिग्नल सुटतो,
जो तो मीठासारखा पेटतो आणि हॉर्न मारत सुटतो.
ती रिक्षा, ती टॅक्सी, तो जडावलेला ट्रकही सरसावतो,
जाता जाता सायकलावलाही मला दरडावतो

अवाजाचा कलकलाट असह्य होतो,
समोरची धुळवड असह्य होते

मी लगेच उघडलेले डोळे बंद करतो
तडक उठतो आणि एका मॉलमध्ये जातो.

आतली गार हवा मला शांत करते, सगळा शीण सरतो
आतमधला झगमगाट माझा खिसा रिकामा करतो.

तृप्त मनाने मी बाहेर येतो,
सगळा इंडिया शायनिंग होतो

माझ्या वातानुकुलित गाडीत बसून मी पुन्हा डोळे मिटून घेतो
गार गार हवेत मी स्पिरिचुअल इन्स्पिरेशन शोधतो
सेल्फ ऍक्चुअलायझेशन होऊन पुन्हा डोळे उघडतो
सताड डोळ्यांनी थंड काचेपलिकडे पाहतो

रस्त्याच्या बाजूला लोक करू नये ते करीत असतात

भिकारणीच्या गळ्यात सोन्याचा साज
हगत्या लाज का बघत्या लाज?

मनातले मांडे मनातच राहतात, आणि नको ते घडतं
उतरलेलं विमान पुन्हा आकाशात उडतं

गर्दी विलोभनीय वाटायला लागते, धुळीला मृद्गंध सुटतो
दुरून डोंगर साजरे हा फॉर्म्युला पुन्हा मनाला पटतो

दर वर्षी मी येतो दर वर्षी असं होतं
हातात असतं ते नेहमीच मला नकोसं होतं

मग मी पुन्हा डोळे मिटून घेतो आणि
लबाड मांजरासारखं दूदू चटाचटा पितो.

कुणीच मला पाहत नाही, मला अजिबात संशय नसतो
मांजरं खरंच मूर्ख नसतात, मी मात्र नक्कीच असतो.