झुलवा

रात्रीला स्वप्नाने सजवा
स्वप्नाला अश्रूंनी घडवा

त्यांची दु:खे जेथे पिकती
तेथे तुमची कळकळ जिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
खेळ संपता - तंबू हलवा...

नसे जाणता राजा आता
कशास कोणी खिंडी लढवा?

नेता म्हणतो, "सूर्य लपवला -
(जयद्रथांना खुशाल उडवा!)"

धर्म, राजसत्ता अन आम्ही
युगायुगांचा चालू झुलवा...