दिशा, वाट अन् `वाट'

बिनचेहर्‍याच्या अफाट शहरात
होता मला एक जीवलग मित्र
जणू हरवलेल्या माणसांमधलं
माझं रंगभरलं हिरवं चित्र

तो मला आवडायचा अन
मीही, त्याला आवडायचो फार
चर्चा, मस्करी, थट्टेला
पूर यायचा अपार...

पण हळूहळू दिवस सरले...
पाहता पाहता वर्षही सरलं...
माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं
हे तेव्हा कुठे मला आठवलं!

आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची
कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली
नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ
खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...

पण आता केला निश्चय
अन ठरवलं मनाशी ठाम
उद्य करू फोन त्याला अन सांगू,
`मला तुझी दोस्ता याद येते जाम'

पण `उद्या' आला अन `उद्या' गेला
आमच्यातला दुरावा वाढतच गेला...
एके दिवशी अचानक तार आली..
तार होती, की मित्राला देवाज्ञा झाली!

कसलं आयुष्य, कसली स्पर्धा,
कसली शर्यत अन कसलं काय...
पाहता पाहता मैत्र संपलं,
हाती माझ्या उरलं काय...

बिनचेहर्‍यांच्या या अफाट शहरात
आता कुठला दोस्त, कुठली दोस्ती...
मित्र गमावलेल्या चेहर्‍यांची
गर्दी माझ्या सभोवती...

- श्रीपाद ब्रह्मे. (स्वयंस्फूर्त.)
-----------------
तुंबलेल्या कोंदट खोलीत
होता एक `जवळचा' मित्र
त्याच्याविना विचारत नव्हतं
मला काळं कुत्रं

एकाच खोलीतलं जिणं
अन एकाच ग्लासातलं पिणं,
आसपासच्या जगाशी
आम्हाला देणं ना घेणं

घरून आलेला `पॉकेटमनी'
अर्धा महिनाच पुरायचा
उधार-उसनवार्‍यांनी
उरला महिना काढायचा

समोरच्या टुमदार बंगल्यातली
`गोरटेली' दोघांना आवडायची
तिच्या स्वप्नांतच आमची
एकेक रात्र सरायची..

माझेच कपडे, परफ्यूम वापरून
साल्यानं तिला पटवलं
आपलं `खोटं नाणं' तिच्या
बापाच्या बंकेत वटवलं

उद्या भेटतो सांगून
तो गेला तो गेलाच!
माझ्या जिवावर जगून
माझ्यासाठी `मेलाच!'

`उद्या' आला
आणि`उद्या' गेला
पण माझा `जवळचा' मित्र
कधीच नाही भेटला

कधी जातो आमच्या अड्ड्यासमोरून
त्याच्या आलिशान मोटारीतून
अन बघतो तुच्छतेनं
काळ्या काचांपलीकडून

त्याच जुन्या कोंदट खोलीत
आता मी एकटाच राहतोय
बंगलेवाल्या पोरींकडे
आता `वेगळ्या' नजरेनं पाहतोय...

- अभिजित पेंढारकर. (आगाऊपणे स्वयंस्फूर्त.)
----------------

(इतरभाषिक मजकूर वगळला : प्रशासक)

मूळ इंग्रजी कविता वाचण्यासाठी खालील दुवा वापरा.

दुवा क्र. १