काल रात्रीपासून डोक्यात एक नवा कथानायक घोळ घालत होता,तेवढा झटपट लिहून काढावा म्हणून आज सकाळी जरा लवकरच उठलो.घराचं दार उघडत नाही तो समोरचा नाना आम्हाला सामोरा(खरंतर पाठमोरा)गेला.नको तो अवयव खाजवत बसायची लोकांना भारी खोड.च्यामारी!उद्या त्याला स्क्रबिंग ब्रशच घेऊन देतो(ओशाळला तर ठीक-नाहीतर ब्रशचे पैसे वाया जायचे)सकाळी सकाळी नको त्या गोष्टी नजरेस पडतात.
म्हटलं लवकर जाऊन प्रातर्विधी उरकून घ्यावा,पण हे सालं चाळीतले आयुष्यच बेकार.एकवेळ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जागा वेळेवर मिळेल,पण सकाळी वेळेवर संडास रिकामं मिळेल याची खात्री नाही.प्रसंग निभावून नेला.दिवसेंदिवस आमच्या सहनशक्तीत कमालीची वाढ होतेय.काम फत्ते करताना भिंतीवरच्या मजकुराकडे सहज नजर गेली.प्राचीन मानवाने बनवलेल्या गुहेतील भित्तिचित्रेही इतकी रेखीव नसावीत.शिवाय इतका मर्यादित वाचक वर्ग असतानाही लोक आपली साहित्यविषयक आस्था सोडायला तयार नाहीत,हे त्या भिंतीवरचे मजकूर वाचून लक्षात यावे.(कोण म्हणते तरुण पिढीला साहित्याविषयी प्रेम नाही?) शिवाय चाळीत घडणाऱ्या रोजच्या घटनांचे इतक्या परखड शब्दांत विश्लेषण.हे समाजोपयोगी काम विनामोबदला करणा-या त्या अज्ञात निर्भीड पत्रकाराचे मी मनातल्या मनात आभार मानले.
दुपार ही केवळ जेवण व वामकुक्षी घेण्याकरिता असते असा माझा समज होता,आपल्या हिंदुस्थानातील कित्येक महान तपस्वींनी त्यांची दुपार पहुडण्यातच घालवली असे मी कुठेसे वाचले होते.परंतू आधुनिक काळात मानवाला त्याच्या प्राचीन संस्कृतीचा विसर पडत चाललेला दिसतो असे आमच्या मातोश्रींच्या शब्दावरून जाणवले("कार्ट्या,लोळत पड दिवसभर,बाकी काही करू नको."-इति मातोश्री)दळण आणणे ह्यासारखे हलके काम माझ्यासारख्या भावी साहित्यसम्राटाला सांगताना(तेही दुपारी)आमच्या मातोश्रींना काहीच वाटले नाही.जुन्या पिढीला साहित्य व साहित्यिकांविषयी आदरच राहिला नाही.
संध्याकाळी काही वेळ प्रभात रोडच्या कमला नेहरू बागेत जाऊन फेरफटका मारला.नंतर बाहेर येऊन चहा ढोसला व सिगरेट फुंकली.दहा रुपये धारातीर्थी पडले.आज काल महागाई किती वाढली आहे नाही.माझ्यासारख्या नवसाहित्यिकांना(चिंतनाकरिता) सिगारेटचा धूर किती गरजेचा आहे हे सरकारला ठाऊक नाही काय? भाववाढीच्या नावाखाली जनतेची सर्रास लूट होतेय.सरकारचे हे धोरण राष्ट्राच्या तमाम साहित्यिक व साहित्याविषयीच्या उदासीन भूमिकेचा धडधडीत पुरावा आहे.माझे हे विचार मी आसपासच्या जनतेसमोर माझ्या ज्वलंत(सिगारेटसह)शब्दांत मांडले.मात्र त्यांनी ते फारसे मनावर घेतलेले दिसले नाही.समाजाला आजकाल साहित्य व साहित्यिकांविषयी आदर राहिला नाही.
रात्री जेवण करून शतपावलीकरिता बाहेर पडलो तर नेमकी मांजरेकर मावशींची मांजर आडवी गेली,असल्या अंधश्रद्धा मी पाळत नाही.पण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले असल्यामुळे त्यांचे मन मोडवत नाही.पाच पाउलं मागे गेलो तर नेमका मागून येणा-या दोडके काकांना धक्का लागला.आधीच ऊसाच्या चिपाडासारखा दिसणारा तो कृश देह,सांडण्याच्याच बेतात होता.कसाबसा सावरला.भलताच भडकला-म्हणाला "हे सगळं तू जाणून बुजून करतोयस हे न जाणण्या इतपत मी मूर्ख नाही.तुझा लेख आमच्या वर्तमानपत्रात छापला नाही म्हणून असा सूड उगवतोयस होय चांडाळा.तुझा तो थर्डक्लास लेख शेंबड्या पोरांच्या वाचण्याचाही लायकीचा नव्हता.म्हणूनच छापला गेला नाही." चार पाच शिव्या हासडून बेणं गेलं एकदाचं.खरंतर 'आमच्या वर्तमानपत्रात' म्हणण्याएवढा तो दोडका काही मोठ्या हूद्द्यावर नाही.तो त्याच वृत्तपत्रसंस्थेत काम करतो एवढंच.शेजारधर्म म्हणून लेखाबरोबर जोडून संपादकाला लिहिलेल्या पत्रात मी याच्या नावाचा उल्लेख केला तर एवढा भाव वाढला याचा.आख्ख्या चाळीला "माझा वशिला लावला" म्हणून बोंब मारत फिरत होता."निंदकाचे घर असावे शेजारी" या तुकोबांच्या सांगण्यावर माझा विश्वास आहे.उद्या मी मोठा साहित्यिक झालो की माझ्या एखाद्या कथा-कादंबरीत याला खलनायक बनवणार आहे.मनाशी पक्का निर्धार करून परत घरी गेलो आणि एका नव्या कथेची जुळवाजुळव करत सरळ अंथरुणात शिरलो.
-इनोबा म्हणे (inoba.blogspot.com)