माणदेशी सफर : भूषणगड, मायणी, वारूगड व संतोषगड.

शनिवार दिनांक १५ मार्च, गेले दोन तीन महिने नुसतेच जाउया, जाऊया असे म्हणत होतो तो मुहुर्त अखेर जुळून आला. नचिकेत, केशवसुमार, आरती, फदि आणि मी असे पाच जण संध्याकाळी सातच्या सुमारास पुणे बंगलोर महामार्गाने निघालो. खरे तर बेत वरंधा घाट उतरून मंगळगडावर जाण्याचा होता. पण बर्‍याच दिवसांनी भटकायला बाहेर पडलो होतो हे लक्षात घेता, त्यापेक्षा सोप्या अशा भूषणगडावर जावे असे वाटेतच ठरले.

भूषणगड
भूषणगड हा सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातला एकमेव किल्ला असावा. हा सगळा भाग मुळातच सपाट, फार तर फार एखाद दुसर्‍या खुज्या टेकडीचा. त्यामुळे आजवरच्या भटकंतीत या भागाकडे कधी गेलोच नव्हतो. नेटवरही फार काही माहिती उपलब्ध नव्हती. प्रथम सातारा गाठले, मग रहिमतपूर फाट्याला वळून रहिमतपूर आणि तिकडून पुसेसावळी गाठले. दहा वाजून गेले होते, तेंव्हा रस्त्यावर तुरळकच दिसणाऱ्या माणसांना विचारत विचारत मासुर्णे गावाला पोहोचलो. पाळंदेंच्या पुस्तकात मासुर्णेहून गडाच्या पायथ्याजवळ असलेला होळीचा गाव पाच एक किमीच्या अंतरावर आहे, गाडीरस्ता आहे असा उल्लेख होता, मासुर्णेत एका माणसाला विचारून एका खडबडीत रस्त्यावर गाडी वळवली, आणि तिथेच फसलो कारण थोड्याच वेळात रस्ता संपून फक्त खडबडीतपणा शिल्लक राहिला, जीपही मोठ्या कष्टाने नेता येईल असा प्रकार होता, चौफेर सपाट, उजाड आणि निर्मनुष्य प्रदेशात डावीकडे पुढे थोडे दुऱ एक टेकडी दिसत होती. तोच भूषणगड असावा यात शंका नव्हती, पण रस्ता तिकडे न जाता समांतर जात होता. तीन एक किमी असे अर्ध्या पाऊण तासात कापल्यावर, अजून पुढे जावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला. दोघेजण विजेरी घेऊन पुढे गेले, त्यांची विजेरी बघून मागून कुठूनतरी वस्तीतून लोक विजेरी दाखवू लागले आणि शिट्या मारत आमच्याकडे येऊ लागले. आम्ही पुसेसावळी गावातून आलो तेंव्हा हे नाव कुठे तरी ऐकले आहे असे म्हणणाऱ्या फदीलाही ते कुख्यात बिरू बापू वाटेगावकरच्या दरोडेखोर टोळीचे गाव आहे हेही नेमक्या वेळी आठवले होते. विजेर्‍या हळूहळू आमच्याकडे येऊ लागल्या तसे आम्हीही काठ्यांसह उभे राहिलो. मी तपशील देत नाही, पण असे रात्री अपरात्री अनोळखी ठिकाणी जातो त्यामुळे वेळ आल्यास छोटीशी लढाईच करता येईल इतपत सामुग्री गाडीत असते. ते लोक जवळ आले आणि थोड्या सवाल जबाबानंतर कळले ते वस्तीवरचे तरूण होते आणि आम्ही दरोडेखोर आहोत अशी त्यांना शंका आली होती, म्हणून तेही घाबरूनच दबकत दबकत आले होते. त्यांच्याशी थोडा वेळ बोललो, आम्ही मासुर्णेवरून निमसोड या गावी जाऊन तिकडून पक्क्या रस्त्याने होळीच्या गावाला जायला हवे होते असे कळले, पण परत फिरण्यातही अर्थ नाही तेंव्हा असेच सरळ जा असा सल्ला मिळाला आणि आम्ही निघालो.

थोड्याच वेळात त्या रस्त्यातून सुटलो, आणि एका कच्या पण सुसह्य रस्त्याने गडाच्या पायथ्याला पोहोचलो. पाठीला पिशव्या अडकवल्या आणि बऱ्याच दिवसांनी गडाची वाट चढू लागलो. गड फारसा उंच नाही, वर देवीचे देउळ असल्याने पायर्‍या बांधल्या आहेत, आणि विजेचे दिवेही नेले आहेत. तरीही कोणीतरी दोघांनी शेवटी वाट चुकण्यात यश मिळवलेच. गडाची तटबंदी, बुरूज आणि दरवाजा बर्‍यापैकी स्थितीत आहेत. देवळासमोर एक चौकोनी विहिर आहे, आणि फरसबंदी प्रांगण आहे. मध्यरात्र झाली होती, आमचे डबे उघडले आणि जेवण आटोपले. हवेत सुखद गारवा होता. देवळाला कुलूप लावलेले होते, तेंहा मग अंगणातच पथाऱ्या पसरल्या. मात्र जिथे बूट काढले तिथेच एक विंचू दिसल्याने, थोडी सावधगिरी बाळगली.

सकाळी देवळाचा पुजारीही वर चढून आला. गडावर पाण्याची एक टाकी बांधलेली आहे, त्यात पुरेसे पाणीही आहे, त्यामुळे एकूण मुक्काम सुखावह झाला. गडप्रदक्षिणा केली. यमाईचा डोंगर, वर्धन- महिमानगडाची रांग, मायनी तलाव वरून दिसतात. गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही सिंधण राजाने बांधला, आणि शिवरायांच्या ताब्यात होता एवढीच माहिती. ईतर वास्तूही नाहीत, पण गडाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार आहे तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती कळली. सूर्योदय होता होता खाली उतरू लागलो.

मायणीचे पक्षी अभयारण्य
निमसोडमार्गे मायणी तलावाकडे जाउ लागलो, वाटेत दहिवडी - तासगाव रस्ता ओलांडला. मायणी तलावाच परिसर पक्षी अभयारण्य आहे. सुमारे एकशे वीस जातींचे पक्षी इथे दिसतात असे वाचले होते. आमचा कर्नाळा पक्षी अभयारण्याचा अनुभव काही फार छान नव्हता. पण मायणी जवळ येताच मात्र अनेक सुंदर पक्षी दर्शन देऊ लागले. तलावाला पोहोचेपर्यंत थोडे ऊन वाढले होते, नाहीतर अजून बरेच पक्षी बघायला मिळाले असते. तरी अनेकदा अगदी जवळून मोर, खंड्या आणि इतरही नाव माहित नसलेले वीस पंचवीस प्रकारचे पक्षी पाहिले. नावे मला माहित नाहित त्यामुळे मी एक पिटुकला गडद मखमली निळा पक्षी तर फारच सुरेख असे काहीतरी लिहू शकेन..

वारूगड
पक्षी बघून झाले, पण फार उशीर झाला नव्हता, मग अजून एखादा गड करावा असा बेत केला आणि मायणी, दहिवडी, फलटण रस्त्यावरून फलटणपासून वीस किमी असलेल्या गिरवी या गावी पोहोचलो, तिकडून पाच किलोमिटर पुढे जाधववाडा. आता आम्ही वारूगडाच्या पायथ्याशी होतो. सूर्य माथ्यावर आला होता, वाटेत एका शेतावर पाणी सोडले होते, त्याखाली डुंबावे असे वाटत होते, पण तसेच पुढे निघालो. गड सगळा रखरखीत, पहिला चढ, मग एक पठार मग गडाच उभा चढ, तटबंदी, दरवाजा, आणि आत गेल्यावर पुन्हा बालेकिल्ल्याचे कातळी टेकाड, तटबंदी असा सगळा साज होता. बालेकिल्ल्याच्या कातळात उगवलेला एक मोठा वटव्रृक्ष खालूनही दिसत होता. गडाचा खडकही वेगळाच, बराचसा ठिसूळ. तासाभरात गडावर दाखल झालो, तसेच सरळ वर जाऊन त्या वटवृक्षाखालून बालेकिल्ल्यावर चढता येईल असे वाटते, पण वाट उजवीकडून आहे, माथ्यावरून खालपर्यंत एक दगडी भिंत उतरली आहे त्यावरून वर चढून गेलो, तिच्या खालच्या टोकाला दरीकडे एक झाड उगवले आहे, त्यावर एक लंगूर वानरांची टोळी मुक्कामाला आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचलो, खाली पाहिले तर पलिकडच्या बाजूला, किल्ल्याच्याच पातळीला एक छोटे गाव आहे, गावात प्रशस्त देउळ आणि पार आहे, कच्या रस्त्याने एक एस्टीपण आलेली पाहिली. एस्टीला अनेकदा नावे ठेवली जातात, पण कुठल्या कुठल्या दुर्गम गावात ते सेवा पुरवतात हे पाहिले की सलामच करावासा वाटतो. असे नेहेमीच पाहिले आहे की गाव फारच छोटे असेल तर तिथे खाजगी जीपवाले धंदा करत नाहीत, आणि गाव पूर्णतः दिवसातून एकदा येणार्‍या एस्टीवर अवलंबून असते.

महादेव डोंगररांगेच्या टोकावरचा हा किल्ला, शिवरायांनी स्वतः बांधला. इथल्या किल्ल्यांना सह्यधारेतल्या किल्ल्यांसारखी छाती दडपून टाकणारी उंची नाही, किंवा अक्राळ विक्राळ दर्‍या पण नाहीत. तरी पण जे काही आहे त्याचा उपयोग करून घेतलेला दिसतो. वारूगडाच्या समोरच सीताबाईचा डोंगर आहे, तिथे पावसाळ्यात फार रम्य वातावरण असते असे वाचले आहे. बालेकिल्ल्यावर पडकी सदर आहे, एक तीस चाळीस फूट व्यासाची तेवढीच खोल कोरडी विहिर आहे आणि त्यात मधोमध उगवलेले एक चिंचेचे मोठे डेरेदार झाड आता वर आले आहे. तसेच पुढे गेले की कड्यावरचा तो खालून दिसणारा वट्वृक्ष, त्याच्याखाली जरा विसावलो, बरोबर आणलेल्या काकड्या फस्त केल्या आणि विश्रांती घेऊन पुन्हा खाली उतरलो.

संतोषगड
या भागातले वर्धनगड आणि महिमानगड आम्ही पूर्वीच केले होते, आता फक्त संतोषगड हा एकच किल्ला बघायचा शिल्लक उरला होता, त्यामुळे मग एवढे आलोच आहोत तर तोही बघावा असे एकमताने ठरले, आणि फलटणला थोडेसे खाऊन आम्ही फलटण पुसेगाव मार्गावरच्या मोळ घाटाअलिकडच्या ताथवडे गावी पोहोचलो (फलटणहून २० किमी)

ताथवडे अगदी गडाच्या पायथ्याशी आहे. गावाकडे जातांनाच किल्ल्याचे व्यवस्थित दर्शन होत राहते. देवळात गाडी लावून, भराभर वर चढू लागलो. अर्ध्या वाटेत बसलेल्या गावच्या दोन पोरींनी इतक्यातच दमलात का, आणि काठ्या कशाला लागतात तुम्हाला असे अगदी धिटाईने आमची खेचायला सुरुवात केली. वर एका पिंपळाच्या झाडाजवळ एक खोली बाधली आहे सध्या ती खोली कम आश्रम आणि त्याच्या मागच्या गुहा आणि पाण्याचे टाके याचा ताबा एका बाईंनी घेतला आहे. आम्ही उजवीकडून वळसा घेत किल्ल्यावर दाखल झालो, समोरच तातोबा महादेवाचे देऊळ आहे. तसेच वर बालेकिल्ल्यावर गेलो की थोडे बांधकामाचे अवशेष आहेत, याही बालेकिल्ल्यावर पुन्हा एक मोठा खोलगट भाग त्यात झाडे आणि एक गुहा आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने अशी व्यवस्था असावी असे वाटते. गडाला प्रदक्षिणा पूर्ण केली. हाही शिवरायांनी बांधलेला गड. महादेव डोंगररांग आडवी पसरली होती.इकडून सुरू होणारा मोळ घाट पार केला की पलिकडे वर्धनगड. पूर्वेला आता जाउन आलो तो वारूगड डोकावत होता, पण इथे मात्र वारूगडासारखा भर दुपारीही सुखावणारा भन्नाट वारा नव्हता. पश्चिमेला उतरणाऱ्या सूर्याबरोबरच खाली उतरलो, दिवसभराची पायपीट आता सर्वांनाच जाणवू लागली होती.

तसेच पुढे लोणंद( तीस किमी ) , शिरवळ( चाळीस किमी ) मार्गे साडेनऊला पुण्यात परतलो ते येत्या तीस तारखेला कोयनेच्या दाट जंगलातल्या महिमंडणगडाला भेत द्यायचे बेत आखतच.

माण तालुक्यात एका दिवसात करता येतील असे वर्धन, संतोष आणि वारूगड आहेत, भूषणगड थोडा दूऱ आहे. भरपूर पाऊस झाल्यावर लगेच गेल्यास हे किल्ले आणि परिसर अधिक आवडेल.

फोटोसह वृत्तांत खालील ठिकाणी.
दुवा क्र. १

फदिने लिहिलेला फोटोसह वृत्तांत खालील ठिकाणी
दुवा क्र. २