ह्यासोबत
दुधाचा ट्रक गुरगुरत समोर थांबला तेव्हा डेअरीच्या पायरीवर झोपलेल्या किट्टूची झोप खाड्कन उडाली. तशी त्याची झोप फारच अलवार होती. कुठेही खुट्ट झाले तरी तो सजगपणे कानोसा घ्यायला तयार असे. त्याच्या या गुणामुळे त्याने कुठल्याही दुकानाच्या पायरीवर पथारी पसरली तरीही कुणाची हरकत नसे. किंबहुना त्याने रोज आपल्या दुकानाच्या पायरीवर झोपावे म्हणून त्याला काही देऊ करण्याचा विचारही दुकानमालकांच्या मनात रुंजी घालून जाई. पण किट्टूची किरकोळ शरीरयष्टी आणि सदैव भांबावलेली अवस्था पहाता त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे ध्यानी येऊन ते गप्प बसत. तरीही, मन चाहेल तेव्हा आपल्या पायरीवर त्याने झोपायला त्यांची हरकत अजिबात नसे. गरज पडली तर हे पाप्याचे पितर आपल्या गेंगाण्या आवाजात काहीतरी कल्लोळ माजवू पाहील एवढी खात्री त्यांना होती. भुंकणारे पण न चावणारे कुत्रे पाळणारे लोकही असाच विचार करीत असावेत.
त्याचे नाव किट्टू होते हे एक सर्वमान्य गृहितक होते. तो कोण, कुठून आला, त्याचे नाव काय याचे कुणाला काही घेणेदेणे असण्याचे कारण नव्हते. अरवली कॉफी शॉपच्या कृष्णाप्पांना हे ध्यान दिसले आणि त्यांनी त्याला थारा दिला. कृष्णाप्पांनी त्याचे बारसे 'किट्टू' केले, विषय संपला. त्याचे खरे नाव काय हे जाणून घ्यायचे कष्ट ना कुणी उठवले, ना कुणी तसा विचार केला.
ट्रकच्या आवाजाने झोप उडालेला किट्टू लगेच कामाला लागला. बाह्या सरसावण्याचीही गरज पडू नये अशा बुशकोट आणि पँट या वेषात तो बारा महिने चोवीस काळ असे.
खालचा ओठ अजून बाहेर काढून त्याने आसपास एकदा पाहून घेतले. ही त्याची एक भाकड सवय होती, मग आसपास पाहण्यासारखे काही असो वा नसो. आणि झपाट्याने दुधाच्या पिशव्यांचे प्लास्टिकचे क्रेट उतरवायला सुरुवात केली.
=====
किट्टूच्या झिडपिडीत शरीरात इतका कामाचा उरका असेल हे कुणाच्याही पट्कन ध्यानी येत नसे. पण आल्यावर मात्र सगळे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नसत. वरचा ओठ दाताखाली दाबून तो झपाटल्यासारखा काम करी.
कृष्णप्पांना तो कसा भेटला तीही एक कथाच होती.
रामण्णा हेगडे नामक हिटलर-मुसोलिनी-स्टॅलिन-चर्चिल यांच्या एकत्रित अवताराचा वारस म्हणून कृष्णप्पांचा जन्म झाला होता. हे स्वतःला मान्य नसल्याचे जेव्हा कृष्णप्पांच्या लक्षात आले तेव्हा ठिणगी पडली होती. वत्सलाक्कांची अवस्था मात्र रुबक्कल मध्ये सापडलेल्या उडीद-तांदुळाच्या मिश्रणासारखी झाली होती. कळत्या वयापासून सोसलेल्या नवर्याच्या झळा आणि सावळ्या वर्णामुळे नामाभिधान झालेल्या मुलाची ओढ यात नावाप्रमाणेच मृदू असलेल्या त्या लहानखोर चणीच्या स्त्रीची त्रेधा उडाली होती. अखेर ती घर सोडून गेली, आणि मंत्रालयामधल्या स्वामींच्या समाधीजवळच्या एका विहिरीने तिची जीवनयात्रा संपवायला हातभार लावला. घर सोडून गेल्यावर बायको आपल्याला मेली असे जाहीर करून रामण्णांनी तिचे देहसंस्कार करायला नकार दिला आणि कृष्णप्पांच्या पाठीवर शेवटची काडी पडली.
चुन्यासारख्या पांढर्याफेक पडलेल्या तिच्या ताठलेल्या नि सुरकुतलेल्या पावलांना अश्रूभरल्या डोळ्यांनी भिजवून कृष्णप्पा चालते झाले. स्वप्नात कुबेर आणि प्रत्यक्षात फकीर असलेल्या सर्व लोकांची कर्मभूमी मुंबई गाठण्याइतके पैसे सोबत होते. स्कॉलरशिपचे पैसे साठवून घेतलेली चार पुस्तके होती. ती पुस्तकांची पुरचुंडी पाहून एका माणसाने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी अशाच फकिरी अवस्थेत मुंबई गाठलेले आणि आता स्ट्रँड बुक स्टॉलचे मालक असलेले शानभाग होते ते. त्यांचे बोट धरायला मिळाल्याने कृष्णप्पांना मुंबईचे चटके सोसावे लागले नाहीत. पण त्यांच्यासारखी पुस्तकांची नशा आपल्याला चढत नाही हे लक्षात आल्यावर मात्र काही वेगळे करायची त्यांची धडपड सुरू झाली. मुंबईचे दमट-घामट जीवनही त्यांना पचनी पडेना. अखेर काही विस्कळीत अनुभव गाठीला बांधून त्यांनी पुणे गाठले. अजून थोड्या तुटक अनुभवांची माळ गुंफल्यावर त्यांना हा कॉफी विकण्याचा व्यवसाय पचनी पडला. सुधाक्कांसोबत संसार थाटून ते इथेच रमून गेले.
मात्र मधूनच त्यांना आठवणींनी स्मरणकातर व्हायला होई. मग ते सरळ स्वारगेट गाठत आणि 'शिमोगा', 'भटकळ', 'होनावर', 'शिर्सी', 'सिद्धापूर' अशा पाट्या मिरवणार्या गाड्यांकडे पाहून डोळे निववून घेत.
अशाच एका स्मरणयात्रेत हे ध्यान कृष्णप्पांना दिसले होते. डोळ्यांत हरवलेले भाव मिरवत तो एकटाच अंग चोरून उभा होता. का कुणास ठाऊक, पण त्याच्याकडे बघितल्या बघितल्या त्या अश्राप जिवानेदेखील त्याची वत्सलाक्का नियतीला दान केलेली असावी असे कृष्णप्पांना चमकून गेले.
तेव्हापासून किट्टू त्यांच्या कॉफी शॉपचे अविभाज्य अंग बनून गेला होता. त्याची समज बेताची असली तरी 'पीबेरी','प्लँटेशन' आणि 'रोबस्टा' हे कॉफीचे तीन साफ वेगळे प्रकार आहेत, आणि 'चिकोरी' हा कॉफीचा प्रकार नाही एवढे त्याने मन लावून उमटवून घेतले होते. कृष्णप्पा त्याला कॉफीत कधी हात घालू देत नसत म्हणा. किंबहुना किट्टूला काम असे काही नेमून दिलेले नव्हतेच. खालचा ओठ बाहेर काढून तो सदैव कामात गुंग असल्यासारखा त्या दुकानात आणि आसपास खांदे पाडून हिंडत राही. कुठलाही खोका किंवा हारा उतरवायचा असला तर त्याला लगेच सुगावा लागे, आणि आपल्या हाडकुळ्या हातात दडलेली ताकद सिद्ध करायला तो पुढे होई. कधी अचानक कुंचा घेऊन झाडलोट करू लागे. मात्र दुकानात गिर्हाईक असताना अशी अवचित झाडलोट करू नये हे कृष्णप्पांचे सांगणे त्याच्या चांगले लक्षात होते.
दुपारच्या लांबलचक पुणेरी सुट्टीत शटर ओढलेल्या दुकानात बसून मुरुक्कू, तेंगूळ, पुडी यांच्या पिशव्या तयार करणे, सांबाराचे बाळकांदे चाळून गाळसाळ कचर्यात टाकणे, उदबत्त्यांचा हारा नीटनेटका करून ठेवणे ही कामे तर त्याचीच असल्यासारखी झाली होती. कृष्णप्पांचा उजवा हात असलेला रमेश केवळ सवय म्हणून झोपाळलेल्या डोळ्यांनी तिकडे पहात राही.
संध्याकाळी दिवेलागण झाली की न चुकता किट्टू हात जोडून काहीतरी पुटपुटे. पण ती भाषा कुठली होती याचा सुगावा कधीच कुणाला लागला नाही.
शेजारच्या ओंकार ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हरकी करणार्या माळकरी निवृत्तीशी मात्र त्याचे घट्ट मैत्र होते. किट्टूची राहण्याची सोय करण्यासाठी कृष्णप्पांनी त्याला सांगितले तेव्हापासून. टेकडीमाथ्यावरच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत निवृत्तीच्या खोपट्यात किट्टूची वळकटी पडली. आणि डोळसनाथाच्या देवळातल्या भजनाला निवृत्तीचे बोट धरून तो हजेरी लावू लागला. मात्र रोज रात्री त्याच त्या ठिकाणी रहायला पाहिजे असे रटाळ बंधन किट्टूने कधीच मानले नाही.
अपघात, आजारपण या आणि अशा अतार्किक कारणांनी एकेक करीत सगळे कुटुंब गमावून बसलेल्या निवृत्तीला जीव गुंतवायला किट्टूच्या स्वरूपात एक जितेजागते साधन मिळून गेले. माऊलींचा जप करीत तो किट्टूला जीवनाचे धडे देऊ लागला.
=====
दुधाचे क्रेट उतरवून झाल्यावर कुलकर्णी कॅशियरनी नेहमीप्रमाणे किट्टूला एक अर्ध्या लिटरची पिशवी मजुरी म्हणून टेकवली. त्याने ती दातलून फोडली आणि थंडगार दुधाची धार सरळ घशात सोडली. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्याचे मिळेल तेव्हा, मिळेल तसे, मिळेल तेवढे असे उंट-धोरण होते.
ओठावरून खाली उतरणारे ओघळ निपटत तो कॉफी शॉपकडे आला. समोरच्या 'दुर्गा टी अँड स्नॅक्स सेंटर'चा स्टोव्ह फरफरायला लागला होता. वड्या-समोशांच्या सारणासाठी बटाटे उकडायला लावून संतोष त्याची दिवसाची पहिली विडी चवीचवीने ओढत होता. किट्टू दिसल्यावर त्याने "किट्टूशेठ" अशी आरोळी ठोकली आणि लगबगीने दोन कप चहा भरला. किट्टूने खालचा ओठ अजूनच पुढे काढला आणि संतोषकडे रोखून पाहिले. त्याला "किट्टूशेठ" म्हटलेले अजिबात आवडत नसे.
खदखदून हसत संतोषने "का बगू र्हायला रं बागड्यावानी..... घे, च्या पे" म्हणून एक कप किट्टूच्या हातात कोंबला आणि स्वतः दुसरा कप भुरकायला सुरुवात केली.
खाली मान घालून किट्टूने चहा संपवला आणि तो नळावरून पाण्याची बादली भरून आणायला गेला.
मग मात्र दुकान सुरू व्हायची वेळ होईस्तोवर त्याला उसंत मिळाली नाही. सगळा परिसर लख्ख झाडून, त्यावर सडा टाकून, संतोषची सायकल स्वच्छ पुसून, स्वतःची आंघोळ उरकून, ओले कपडे दुकानामागच्या संडासच्या खिडकीवर वाळत टाकून त्याने धुपाची कांडी पेटवली तेव्हा कृष्णाप्पा रिक्षातून उतरतच होते.
शेजारच्या ओंकार ट्रान्सपोर्टमध्ये लगबग सुरू झाली. संथ डुलत निवृत्ती कामावर हजर झाला. त्याला पहाताच तुरतुरत किट्टू तिकडे पळाला. मग संतोष, निवृत्ती आणि किट्टू अशी एक अर्ध्या-अर्ध्या चहाची मैफल झडली.
"आज दोपारच्याला घरी बशितो का रं किट्टप्पा? त्या भितीला भोकसा पडलाय थतं चार इटा लावाय त्यो गनपा येतुया, आनि मपल्या मालकाला आत्ता लगीच मारुंज्याला माल टाकायचाय म्हंतुया त्यो."
किट्टूने समजल्यासारखी मान हालवली.
संतोषने परत "किट्टूशेठ" अशी आरोळी मारून किट्टूला डिवचले, आणि त्याला गरमागरम सामोसा खायला फोडून दिला. तोंडात घातलेला पदार्थ जीभ भाजत असला तरी थुंकून टाकायचा नाही ही किट्टूची सवय लक्षात आल्यावर संतोष नेहमी त्याला समोसा वा वडा फोडून फुंकरूनच देत असे.
निवृत्तीला खेपेला जायला अजून थोडा वेळ होता. किट्टू सामोसा खात असताना त्याने किट्टूला एकदा तरी देहू-आळंदी घडवून आणण्याचा निश्चय परतून जाहीर केला. "त्येच्याबगर माजा धे काय पडत नाही बग" अशी खात्रीही दिली. नेहमीप्रमाणेच संतोषने "कुठं देहू-आळंदी करू राह्यला? एकदा आमच्या शेगावाला येऊन जाय नं? दिपवाळीला येतो का? आपल्या गावापासून दोन बिल्लास तर शेगाव. घेऊन येयजो नं तुह्यावाला ट्रक. सगळे संगतीनं जाऊ नं" असा फाटा फोडला. "माऊलींची विच्चा" म्हणून निवृत्तीने हात जोडले आणि माल भरून झाल्याचा निरोप मिळाल्यावर तो गेला.
दिवस सुरू झाला.
दिवाळीच्या खरेदीला बाहेर पडलेल्या माणसांनी रस्ते वाहू लागले. झांगरी, सोंटे, असल्या वेगळ्यापरीच्या पदार्थांची आगाऊ नोंदणी करून करून कृष्णप्पांचे हात दुखू लागले. तेंगूळची पाकिटे भसाभस संपू लागली. दिवाळीत येणार्या पाहुण्यारावळ्यांना कमी पडायला नको म्हणून कॉफीची घाऊक खरेदी सुरू झाली. इतकी, की कॉफीबिया दळण्याचे यंत्र गरम झाल्याने मधून मधून बंद ठेवावे लागले. ते सुरू व्हायची वाट पहात पहात लोकांनी वांगीभात, बिसीबेळे भात, पुळीओद्रै यांचे मसाले खरेदी करण्याचा सपाटा लावला. पैसे मोजमोजून रमेश फेसाटला.
हलत्या बैलगाडीखालून चालणार्या कुत्र्यासारखा किट्टू वावरत राहिला.
दुकान बंद करायची वेळ टळून जात चालली तशी किट्टू अस्वस्थ झाला. निवृत्तीने दुपारी खोपट्यात थांबायला सांगितले होते. तिकडे जाणे भाग होते. पण असे दुकान सोडून गेल्यावर कृष्णप्पांना काय वाटेल या विचाराने त्याची कुतरओढ सुरू झाली. काहीतरी बिनसले आहे याची कल्पना कृष्णप्पांना आली. पण मान वर करायलाही फुरसत नव्हती. आणि काही बिनसले असले तर ते किट्टूकडून काढून घेणे ही एक फारच किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. सुदैवाने वर्षातून एखाद्याच वेळी किट्टूचे गणित बिघडे.
अखेर कामाच्या गडबडीतच कृष्णप्पांना युक्ती सुचली. "किट्टू, त्या लक्ष्मीबाईला जाऊन आठवण कर की घरी दुपारी सफाईला यायचे आहे म्हणून. आणि हा डबाही घेऊन जा. जेवून दुपारीच परत ये. आज काय पुड्या-पिशव्या करण्याइतके काही शिल्लक नाहीच आहे." सुधाक्का दररोज दुपारी किट्टूकरता डबा देत. 'किमान एकवेळ तरी त्याच्या मुखात घरचे अन्न जाऊ दे' असे त्यांनी जाहीर केल्यामुळे कृष्णप्पांची त्यापुढे काही बोलण्याची प्राज्ञा नव्हती. कुठल्या गोष्टीला विरोध करणे निरर्थक ठरेल याचा अंदाज अचूक येण्याइतका त्यांच्यातला नवरा अनुभवी होता.
लक्ष्मीबाई किट्टूच्या खोपटाजवळच राहत असे. ती त्यांच्या घरी काम करण्यासाठी गेली वीस वर्षे येत होती. आणि ही वीसही वर्षे ती दुपारीच येत होती. पण किट्टूने सांगितलेले काहीही ती कानाआडच करीत असे. त्यामुळे हरकत नव्हती.
किट्टूने विचार केला. अखेर दुकान एक दिवस सोडून जायला हरकत नाही असा कौल मनाकडून कष्टपूर्वक मिळवून तो चालू लागला.
लक्ष्मीबाई बाहेरच दगडावर कपडे आपटत बसली होती. 'कृष्णप्पांच्या घरी दुपारी जायचे आहे' हा निरोप किट्टूने देताच तिने फणकारून नाक उडवले. या असल्या वेडपटाला कशाला डोक्यावर चढवून ठेवतात ही मोठ्या घरची माणसे ते तिला कधीच कळले नव्हते. पण एकदाच तिने हा विषय काढायचा प्रयत्न केल्यावर "या घरात असले बोलण्याची ही तुझी पहिली आणि शेवटची वेळ" असा चरचरीत डाग सुधाक्कांनी दिला होता. तेव्हापासून तिच्या मनात राग ठसठसत होता.
तिचे नाक उडवणे किट्टूला कळले नाही. निरोप कळला नसेल म्हणून त्याने पुन्हा सांगितला. अखेर "व्हय व्हय, जातीया दुपारच्याला" असे करवादून ते ओरडली तेव्हा समाधानाने मान हलवत किट्टू चालू पडला.
घरी पोचल्यावर त्याला गणपा येऊन गेल्याचे कळले. किट्टू परत अस्वस्थ झाला. निवृत्तीने काम सांगितले आणि आपण ते टाळले हे त्याच्या मनाला टोचत राहिले. डबा खाणे बाजूला ठेवून आधी त्याने गणपाला गाठले. गणपा भाकरी खायला बसला होता. पण ओठ पुढे काढून आणि हनुवटी छातीला टेकवून किट्टू त्याच्याकडे रोखून पाहत राहिला तेव्हा त्याचाही नाईलाज झाला. "चल बाबा, चल.... भाकर खाऊ देशील तर तू कसला..... आता निवृत्तीमाऊलीचं काम म्हनजी म्या काय हयगय करीन का? पन न्हाई ऐकायचास रं बाबा तू" म्हणत त्याने भाकर परत बांधून ठेवली आणि निवृत्तीचे खोपट गाठले.
कोपर्यातल्या खिळखिळ्या झालेल्या विटा काढून परत नीट रचून त्यावर माती लिंपून, आणि दुसरे काम सुरू झाले की तिथून थोडे शिमिट आणून त्यावर अजून लिंपायचे कबूल करून गणपाने सुटका करून घेतली तेव्हाच किट्टूने सुधाक्कांनी दिलेला दहीबुत्तीचा डबा उघडला. खाऊन होईपर्यंत चार वाजलेच. परत दुकानाकडे जाताना त्याने लक्ष्मीबाई गेल्याची खात्री करून घेतली.
=====
दुकानात पोचल्याबरोबर काहीतरी गडबड असल्याची त्याला जाणीव झाली. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच संतोष आपल्या जागेवर नव्हता. आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच कृष्णप्पांनी त्याला बघून नजर चुकवली.
दुर्गा टी अँड स्नॅक्स सेंटरच्या बाकड्यावर बसलेले दोघेजण वडापाव चाबलत बडबडत बसले होते. "नकसुदीक न्हाई गावायचं... ह्ये कंटेनरवालं लई गाभरू असत्यात..... कॉट्टर मारल्याबगर ष्टार्टर न्हाई दाबला जात त्यांचा.... ४०७ काय टिकनार त्यांच्या फुडं.....मग गळ्यात इठूबारायाची माळ असू की सोन्याचा हार असू".
ओंकार ट्रान्सपोर्टमधून संतोष बाहेर पडला. पहिल्या पावसाने स्वच्छ धुऊन निघालेल्या झाडाच्या पानांप्रमाणे त्याचे डोळे दिसत होते. किट्टूला बघताच नजर चुकवीत त्याने सायकल बाहेर काढली आणि झपाट्याने पायडल मारीत तो नाहीसा झाला.
भजनातला एकेक गाता गळा, एकेक वाजवता हात हळूहळू नाहीसा होत जावा तसे काहीतरी किट्टूला झाले. त्याचा खालचा ओठ हळूहळू मागे गेला. डोळ्यांतील चमक नाहीशी झाली. ओठांची घडी पडली आणि चेहरा सर्वसाधारण झाला. गजबजलेला रस्ता ओलांडणार्या कुत्र्याच्या पिलाचा बावरला भाव डोळ्यांतून गेला, आणि अनेकानेक सांगाडे बघितलेल्या, नव्हे, त्यांच्यावर गुजराण केलेल्या गिधाडांचा असहाय्य निर्विकारपणा त्यात उतरला. काहीतरी समजल्याप्रमाणे त्याने मान हलवली आणि तो चालू लागला.
अचानक काहीतरी सुचल्याप्रमाणे तो मागे फिरला आणि कृष्णप्पांना स्वच्छ मोकळ्या आवाजात म्हणाला, "थोरल्या आईंना सांगा दहीभात अगदी झक्क झाला होता. बोटे चाटून काढल्याशिवाय राहवले नाही. येतो."
अचानक झालेल्या या हल्ल्याने कृष्णप्पा गांगरले. "अं, हो, होय, बरं, हं" असे ते काहीतरी निरर्थक बडबडेपर्यंत किट्टू झपाट्याने पावले टाकत नाहीसा झाला.
मृतदेहाची ओळख पटवण्याचे किचकट सोपस्कार पार पाडून संतोष परतला तेव्हा कृष्णप्पा फोर-स्क्वेअरचे झुरके घेत बसल्याचे त्याने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. "किट्टू कुठे गेला" या प्रश्नाला त्यांनी अभावितपणे कानडीतच उत्तर दिले. आणि समोर संतोषचा प्रश्नार्थक चेहरा पाहताच "त्ये गेलं की रे बघ निघून....." अशी एरवीच्या त्यांच्या, एव्हाना पुणेरी झालेल्या, मराठीला न शोभणारी प्रतिक्रिया उमटवली.