इथून पुढे सुरू होतील आपले एकांतवास

तु बोलत असतेस माझ्याशी
दूर कुठे तरी पाहत
एखाद्या नाराज मित्रासारखी

ही अस्वस्थता
ही घालमेल
हे क्षणोक्षणी दुरावत जाणारं क्षितिज
तुझ्या हातांवरील रेषांसारखं
हे नागमोडी आयुष्य

तुला ऐकू येत असतील मध्यरात्री वितळणाऱ्या दुःखाचे आदिम सूर,
झाडांच्या उदास सावल्यांसारख्या
संदिग्ध दिवसांच्या आठवणी

तुझा माझा संबंध बहुधा
संपत आलाय
एव्हाना ,
बाहेर बदलून गेलेत हजारो ऋतू
संपून गेलेत
पानगळींचे शेकडो हंगाम

इथून पुढे
सुरू होतील आपले एकांतवास,
तू आणि मी
जगत राहूत ,दुरस्थ
एकाकी बिंदूंप्रमाणे
रेषांची टोके जुळवत
आपापली संचिते सांभाळत...

विभ्रम

(२६/०४/०८ )