दुर्गाष्टमीच्या रात्री भाविक आले दूरदूर वरुनी
फुलेफळे अन प्रसाद नाना देती मातेच्या चरणी
अलंकारही बहू लेवूनी दुर्गामाता ती सजली
अशीर्वच देतसे जनासी, साडी चोळी ओटी भरली
साडी पांघरली गुरवाने मातेच्या शुभ मूर्तीवर
एकावरती एक चढवली ती दुर्गेच्या खांद्यावर
ढीग जरासा मोठा होता काढुनी टाकी साड्यांना
घडी सुरेख करूनी विकती प्रसाद लगेच भक्तांना
कोणी महिला साडी आणी सद्भावे भाली धरुनी
निघाली लगबगे घराला प्रसाद साडी घेवूनी
दारापाशी एक अभागी बसली जीर्णशा वेषात
बाळा धरुनी घट्ट छातीशी अब्रू कशीतरी झाकीत
साडी बघता नेत्र चमकले, "प्रसाद मजला दे माते
नाही वस्त्र पांघराया मज, दुवा तुम्हाला मी देते"
"किती धीट अन आगंतुक तू, मातेची ही साडी असे.
असे काय लायकी तुझी जे पवित्र साडी मागतसे?
खा हा थोडा शिरा गोड अन जाऊदे मजला घरला
जपून ठेवीन साडी मी हा प्रसाद मस्तकी धरला"
साडी थैलीमध्ये कोंबुनी महिला जाई झणी निघून
धरून अपुल्या बाळा बघते शून्यामध्ये भिकारीण
घरास येऊन महिला ठेवी साडी जपून देव घरात
स्वस्थ चित्ते निजली रात्री मनोमनी ती सुरक्षित
कालानंतर कपाटात साडीवर पडली की कसर
जागोजागी पडली जाळी रंगही विटका नी धूसर
निर्माल्यासवे विसर्जित केली सगळी गाठोडी
रस्त्यामध्ये कुठे भिकारीण बसे पांघरुनी पासोडी
***********************************