नीळकंठेश्वर

मनोगत वर माझा हा पहिलाच लेख असल्याने चूकभूल द्यावी घ्यावी........

आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असूनसुद्धा आपल्याला माहीत नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पाहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहीत होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "नीळकंठेश्वर".

नीळकंठेश्वरला जायला दोन मार्ग आहेत :

जर तुमची स्वतःची गाडी असेल तर पुण्याहून खडकवासला धरण - डोणजे फाटा - खानापूर मार्गे पानशेत गावी जायचं. पानशेतगावाजवळ दोन धरण आहेत आंबी नदीवरील पानशेत धरण (सध्याचे वीर तानाजी मालुसरे धरण) आणि मोसे नदीवरील वरसगाव धरण (सध्याचे वीर बाजी पासलकर धरण). पानशेत धरणाच्या भिंतीखालून एक रस्ता आपल्याला नीळकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो. पण पानशेत धरण ते नीळकंठेश्वर पायथ्यापर्यंतचा हा रस्ता बराचसा खराब स्थितीतला आहे.

दुसरा मार्ग म्हणजे खानापूर आणि पानशेत दरम्यान रुळे नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावात आल्यावर आपल्याला दिसते ते मुठा नदीचे सुंदर पात्र. नदीच्या पलीकडच्या तिरावर जांभळी नावाचे गाव आणि गावाच्या पाठीमागे असलेल्या उंच डोंगरावर वसले आहे "नीळकंठेश्वर". नदी पार करण्यासाठी होड्या तयार असतात. जांभळी गावापासून नीळकंठेश्वर पायथ्यापर्यंत जाण्यासाठी तुमची ४ किमी चालण्याची तयारी पाहिजे. आमच्यापैकी ४ किमी चालण्याची कुणाचीच तयारी नसल्यामुळे नीळकंठेश्वर बद्दल पुरेशी माहिती गावकऱ्यांकडून मिळवून आम्ही पहिल्या मार्गाने जायचे ठरविले. पण जसे आम्ही पानशेत धरण पार केले तसा आम्हाला रस्त्याचा अंदाज येऊ लागला. आम्ही गाडीत बसून होडीची मजा घेत पायथ्यापर्यंत पोहचलो आणि इथूनच डोंगराच्या खडी चढणीला सुरुवात झाली.

समुद्रसपाटीपासून नीळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ अत्यंत सोपा असेल असे प्रथमदर्शनी वाटले. परंतु प्रत्यक्ष जेव्हा चढण चढायला सुरुवात केली तेव्हा लवकरच तिच्या सोपेपणाविषयीचा भ्रम नाहीसा झाला. हसत खेळत ती चढण चढत जाणारी आम्ही लवकरच धापा टाकीत, विश्रांती घेत, कसेबसे स्वतःला सावरत वर चढू लागलो. ह्याचे कारण लहानपणाचे हलके शरीर, चपळाई व डोंगर चढण्याची सवय ह्यांच्या जागी सुस्तपणा, आय टी कंपनीत एका जागी ९-९ तास संगणकावर काम करणे, गिर्यारोहणाचा अभाव हेच असले पाहिजे. पायथ्यापासून तासाभरात आम्ही माथ्यावर पोहोचलो. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची  झुळुक यामुळे क्षणार्धात आमचा थकवा नाहीसा झाला. डाव्या बाजूला असलेले पानशेत व वरसगाव धरण, ती खोल दरी आणि क्षितिजापर्यंत पसरलेली शेते ह्यांचे दृश्य फारच मोहक दिसत होते.

माथ्यावर नीळकंठेश्वराचे प्रशस्त मंदिर आहे, पण मुख्य आकर्षण आहे ते इथल्या पुतळ्यांचे देखावे! दोन रेखीव हत्तींच्या पुतळ्याच्या स्वागत कमानीतून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपणांस दिसू लागतात. नीळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळ्यांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्णलीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपूर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते.   १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे आहेत. संपूर्ण पुतळ्यांचे दर्शन घेत आपल्या नकळतच आपण नीळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरात पोहचतो. त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण त्याचे दर्शन घेतो. वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा यांना हे शिवलिंग सापडले, त्यांनी तिथे सुंदर मंदिर बांधले व हा पुतळ्यांचा देखावा उभारला आहे. सर्जेमामा यांनी सदर देवराई खूप चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून सर्जेमामा यांनी येथे दारू व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. देवळात लावलेल्या कात्रणानुसार सर्जेमामांनी सुमारे ४ ते ५ लाख लोकांना दारूच्या व्यसनातून मुक्त केले आहे. खरोखर त्यांचे कार्य खूप थोर आहे.

आम्ही तेथे गेलो त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हीही महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने परतीच्या मार्गाकडे वळलो.

आपल्या महाराष्ट्रात कितीतरी प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील काहींची ख्याती त्या त्या प्रदेशापुरतीच मर्यादित असली तरी त्याचे महत्त्व त्यामुळे जराही कमी होत नाही.

जेवणाची सोय:
नीळकंठेश्वर डोंगरावर एक छोटेसे हॉटेल आहे तेथे अल्पोपाहाराची सोय होऊ शकते. पानशेतला बऱ्यापैकी हॉटेलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे.

नीळकंठेश्वर परिसरातील इतर काही ठिकाणे:

पानशेत व वरसगाव धरण : संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी हि दोन धरण एका दिवसाच्या सहलीची ठिकाणे म्हणून उदयास येत आहे. पुण्यापासून अंदाजे ४० किमी अंतरावरील या धरणामध्ये बोटिंगची सोय असल्याने सहकुटुंब सहलीसाठी योग्य ठिकाण.

खडकवासला धरण: स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले व सध्या पुण्याची चौपाटी म्हणून ओळखले जाणारे खडकवासला धरण.

सिंहगड :  पुण्याहून खडकवासला मार्गे डोणजे फाट्याहून अंदाजे १०-१२ किमी अंतरावरील ऐतिहासिक स्थळ.

प्रस्तुत लेखाच्या छायाचित्रांचा दुवा   दुवा क्र. १

- योगेश जगताप