एक छोटीशी सकाळ

झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधून उतरली. चरफडत तिने आजूबाजूला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासून ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात. तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमध्ये कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरू झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपून पण जातो. मग तिकिटं काढणं, मॅडम सुट्टे द्या असं कंडक्टरनं सांगितल्यावर सुट्टे पैसे पर्समधून शोधणं ही सगळी कामं नेहमी तिलाच करावी लागायची. मध्ये कुठल्या स्थानकावर गाडी थांबली की मग ह्याला जाग यायची. "तू खाली जाणार असशील तर प्लीज माझ्यासाठी लेज घेऊन ये ना. " त्याला पक्कं माहिती असतं की मी खाली जाणारच आहे. जरा कुठे जबाबदारीची जाणीव नाही ह्या माणसाला. बर ह्याने कुंभकर्णासारख्या झोपा काढल्यावर मी काय करायचं? बसमध्ये काही वाचता येत नाही. वॉकमन बरोबर घ्यायचा मी प्रत्येक वेळी विसरते. खिडकीपाशी बसावं म्हटलं तर ते ह्याला चालत नाही. कारण काय तर साहेबांना वाऱ्याशिवाय झोप येत नाही.

नुसती चिडचिड होत होती तिची. त्यात आता ट्रॅव्हल कंपनीवाले तिच्या मागे लागले. "मॅडम कुठे जायचंय? दादर, अंधेरी, बोरिवली? बसपेक्षा कमी रेट मध्ये... व्हिडिओ कोच आहे मॅडम". "नकोये..... अरे मी आताच मुंबईहून आलीये. परत कशाला जाऊ तिकडे? " ती तिरसटून बोलली. ते ऐकल्यावर पटकन एक-दोन रिक्षावाले आले. "मॅडम कुठे जायचंय? या ना इकडे. " तिला आता बोलायची पण इच्छा होत नव्हती. मग तिने हातानेच नको अशी खूण केली. एक नवरा सोडून बाकी दुनियेला माझी काळजी आहे. एक क्षण तिला वाटून गेलं की रिक्षा करून जावं पटकन. पण तिला आठवलं, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणून मीटरपेक्षा जास्त भाडं घेतलं होतं. ते जवळपास मुंबईच्या भाड्याएवढंच पडलं होतं. त्यामुळे तिनी तो विचार एकदम झटकून टाकला. मग सुटकेस उभी करून त्याला ती जरा टेकली. पर्समधून मोबाईल काढला आणि परत अमरला फोन लावला. पूर्णं वेळ रिंग वाजली पण फोन काही उचलला नाही. तिला आठवलं, लग्नाआधी एकदा सकाळीच दोघांना सिंहगडला जायचं होतं. त्यावेळी एकदम ऑन-टाइम आला होता पठ्ठ्या. माझा पोलो नेकचा टीशर्ट सापडत नव्हता म्हणून मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला तर सारखं घड्याळ दाखवत होता मला. "तुझं मॅचिंगच सगळं सापडलं नसेल म्हणूनच उशीर झाला तुला. लोक सिंहगड पाहायला येणारेत, तुला नाही. " त्याला टीशर्टचं कारण काही शेवटपर्यंत पटलंच नाही. लग्नाआधी अगदी काळजीवाहू सरकार होता. (हा त्याचाच आवडता शब्द).

तिला आठवलं, पावसाळ्यात एकदा गाडी घसरल्यामुळे तिच्या पायाला हेअर-क्रॅक गेला होता. तेव्हा हे महाशय जवळजवळ वीस दिवस रोज तिला घरून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून घरी पोहोचवायचे. त्याला ती म्हणाली सुद्धा "अरे मी जाईन रिक्षाने, कशाला एवढा त्रास घेतोस!!! " त्यावर "मी तुझा जीन आहे. तू फक्त काम सांगायचं, मग मी - जो हुकूम मेरे आका - म्हणून तुझी सगळं काम ऐकणार. " असं त्याच उत्तर. तिला आवडतो म्हणून त्या दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर त्याने तिच्यासोबत (एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून का होईना) पाहिले.

पण आता? एक काम वेळेवर करेल तर शपथ. दहा वेळा ह्याच्या मागे लागल्यावर कुठे काम मार्गी लागतं. शक्य तितकी काम माझ्यावर ढकलणं हेच एक मोठ्ठ काम करतो हा बाबा. लग्न करून हक्काची कामवालीच आणलिये जशी काही ह्यानं. स्वत: कसही वागलं तरी चालेल पण मी मात्र कायम आदर्श पत्नी सारखंच वागलं पाहिजे. आता ह्यानं फोन केला आणि चुकून जरी मला नाही घेता आला तर हा आकाशपाताळ एक करणार. शी वैताग आहे नुसता. विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं आता.

"हाय लेझीम! ", गाडीचा हॉर्न आणि हाक दोन्ही एकदमच ऐकू आले. मी त्राग्यानं समोर पाहिलं तर अमरच होता. कधीही झेलम अशी सरळ हाक मारणार नाही. आई-बाबांनी इतकं सुंदर आणि वेगळं नाव ठेवलं माझं. बारशाच्या वेळी आत्तुला आधीच सांगून ठेवलं होतं त्यांनी की झेलमच नाव ठेवायचं माझं म्हणून. कॉलेजमध्ये असताना काळे मॅडम नेहमी म्हणायच्या खूप छान नाव आहे गं तुझं. लग्नानंतर अजिबात बदलू नकोस. तसं मी अमरला आधीच सांगून ठेवलं होतं की नाव बदलू नकोस म्हणून. त्याला मात्र तांदळात नाव लिहायची फार इच्छा होती. त्यामुळे त्याच सारखं चालायचं की मी नाव बदलणार म्हणून. मी म्हणायचे की आडनाव बदलणार आहे ना मी... आणि ते तांदळात लिहायची एवढी हौस असेल तर माझं आताचंच नाव लिही. त्यावर म्हणायचा त्यात काय थ्रिल आहे मग? तेव्हा नाव बदलू दिलं नाही म्हणूनच सारखा लेझीम म्हणतो. हां... फक्त चिडतो तेव्हा झेलम अशी सरळ हाक मारतो.

आता त्यानं लेझीम हाक मारल्यामुळे तिनी मुद्दामच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असावं. गाडी पटकन स्टॅंडवर लावून तिच्याकडे गेला. "अग सॉरी, काय झालं की... " "राहू दे तुझी कारणं तुझ्यापाशीच. मी जाते रिक्षानी. " त्याचं वाक्य मध्येच तोडत ती म्हणाली. त्यावर काहीच न बोलता त्यानं पटकन सामान उचललं, गाडीवर नेऊन ठेवलं आणि तिच्या बाजूला शांतपणे उभा राहिला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग तिनी हळूच त्याच्याकडे निरखून पाहिलं. दमल्यासारखा दिसत होता. अरे ह्याचे हात पण काळे झालेत की.. ती मनाशी म्हणाली. "का उशीर झाला? " अस तिनी विचारल्यावर त्यानं पण हळूच (आणि सावधपणे) पाहिलं तिच्याकडे. "मी घरातून पाचलाच बाहेर पडलो होतो. पण त्या रतन भेळेपाशी गाडी पंक्चर झाली. आता एवढ्या सकाळी कुठलं दुकान उघडं मिळणार? मग थेट बोराच्या पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेली. तिथल्या त्या केरळी अण्णाला उठवलं झोपेतून. म्हटलं अर्जंट पंक्चर काढून दे. तुला फोन करावा म्हणून मोबाईल काढायला खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की गडबडीत मोबाईल घरीच विसरलो. मग अस वाटलं की कदाचित तुझी गाडी अर्धा पाऊण तास लेट होईल. कारण मागच्यावेळी एकदा लोणावळ्यालाच खूप वेळ थांबल्यामुळे गाडीला पुण्यात यायला लेट झाला होता ना. खरं तर मी तुला एखाद्या एसटीडी बूथपाशी थांबून फोन करायला पाहिजे होता. पण.. " ती त्याच्याकडे बघून प्रसन्नपणे हसली आणि पाठीवर थोपटत म्हणाली "इटस ओके. चल मला चहाची खूप तलफ आलिये. मला 'तुलसी'तला चहा प्यायचाय. " त्यावर एकदम खूश होत तिच्या काळजीवाहू सरकारने "जो हुकूम मेरे आका" अस म्हणत गाडीला किक मारली.