उगीच !

             "पाच रुपड्यांची गोष्ट " हा माझा अनुभव वाचल्यावर काही मनोगतींनी " उगीच" कथा वाचण्याची इच्छा प्रकट केली.इतकी जुनी कथा परत मनोगतवर लिहू की नको अशी शंका मनात असतानाही केवळ मी माझ्या अनुभवात "उगीच" च  उल्लेख  केला असे वाटू नये म्हणून ती १९६५ साली प्रकाशित झालेली कथा त्यांच्यासाठी येथे सादर करीत आहे.  

            त्या वेळी मी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होतो. शेवटचे वर्ष होते. परीक्षा जवळ आली होती. पहिला वर्ग मिळणे आवश्यक होते. त्यामुळे अभ्यास जोरात चालू होता. वसतीगृहाजवळ एक शंकराचे मदीर होते. अतिशय रम्य स्थान आणि आजच्यासारखी वर्दळ नसल्याने त्या काळी खूप शांत पण वाटे, दररोज सकाळी स्नान करून या मंदिरात जाऊन शंकराचे दर्शन घेऊन मगच अभ्यासाला सुरुवात करण्याचा माझा रोजचा नियमच जणू बनला होता. मनावरील भाविकतेचे संस्कार अजून नष्ट झालेले नव्हते, त्यामुळे या दिनक्रमात एक पकारचा मानसिक आनंद मिळत असे.
          सकाळी साडेआठ ते नऊ ही माझी मंदिरात जाण्याची वेळ असायची. पण एक दिवस काही कारणाने नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला, आणि वसतीगृहातून बाहेर पडायलाच साडेनऊ वाजले. नंतर जेवण करून त्या दिवशी एका प्राध्यापकानी मुद्दाम बोलावलेल्या ज्यादा वर्गालाही जायचे होते त्यामुळे मी घाईघाईने निघालो. रस्ता फक्त पंधरा मिनिटांचाच ! भरभर ओलांडून मी मंदिरात पोचलो. आत जाऊन महादेवाच्या पिंडीसमोर उभा राहून डोळे मिटून हात जोडल्यावर एकदम शांत वाटले. दर्शन घेऊन बाहेर पडलो अन् एकदम मला ती दिसली. रस्त्याच्या त्याच बाजूच्या बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. पांढरीशूभ्र साडी, काळा ब्लाउज आणि काळी पर्स या तिच्या ठरलेल्या वेषभूषेत! तिची नाजुक मूर्ती मलाच काय पण आख्ख्या होस्टेलच्या मुलांना सुपरिचित होती. मी कोण हे मात्र तिला माहीत असण्याची शक्यता नव्हती. ती तरी बिचारी किती म्हणून पोरांना लक्षात ठेवणार? सांगायचे कारण म्हणजे त्या दिवशीपासून माझी मंदिरात जाण्याची वेळ बदलली अन मार्गही थोडा वाकडा झाला.
                   आजपर्यंत एकादे दिवशी शंकरास जाणे राहिले तरी मला त्याचे काही विशेष वाईट वाटत नसे पण त्यादिवशीपासून मात्र तसे होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी मी घेऊ लागलो आणि तसे झालेच तर मात्र काहीतरी गुकल्यासारखे किंवा हरवल्यासारखे वाटे. दररोज तिच्या दृष्टीच्या टप्प्यातून जाताना एक वेगळाच आनंद व्हायचा, एकादे दिवशी ती बसस्टॉपवर दिसली नाही तर माझा देवदर्शनाचा काळ थोडा लांबायचा ज्यायोगे निदान बाहेर पडताना तरी तिचे दर्शन व्हावे.
            तिलाही माझी ही (शंकर ) दर्शनोत्सुकता परिचित झाल्यासरखे दिसले, कारण मी येण्यापूर्वी ती बसस्टॉपवर उभी असली तर तिचे डोळे माझ्या येण्याच्या वाटेकडे असत. पण मी दिसताच ती झटकन् मोहरा बदलून बसची वाट पाहत असल्याचा बहाणा करीत असे. कदाचित( किंवा निश्चितच) हा माझा तर्कच असेल पण तो मला आनंददायक होता शिवाय त्याला बाधा आणणारी काही घटना न घडल्यामुळे तो बदलण्याचे कारण वाटले नाही.
         तिच्याशी बोलणे काढावे असे वाटे पण परत ती नाही बोलली तर काय घ्या असे वाटायचे  आणि नव्वद टक्के शक्यता तीच होती. पण मनातल्या मनात खूप संभाषणे जुळवून ठेवली होती. एकाद्या दिवशी मला जाता आले नाही तर वाटे दुसऱ्यादिवशी ती विचारेल, "काय हो काल दिसला नाहीत? " त्यावर मी उत्तर द्यावे, " देवसुद्धा भक्ताच्या दशनासाठी उत्सुक असतो याची कल्पना नव्हती" यावर मुद्दामच काही न कळण्याचा आविर्भाव आणून ती म्हणेल, "दगडाचाच देव, त्याला काय उत्सुकता असणार? " मग तिचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने मी म्हणेन, "मी देवळातील नाही देवळाबाहेरील देवीविषयी बोलतोय" पण सगळी संभाषणे मनातच राहिली, बोलून दाखवण्याची वेळ कधी आलीच नाही.
        काही झाडाना फक्त फुलेच येतात. आमच्या परिचयाच्या वेलीलाही फक्त स्मिताचे एकुलते एक फूल लागले शब्दांची मधुर फळे तिच्या नशिबी नसावीत.
      शेवटच्या वर्षाचा शेवटचा महिना परीक्षेच्या गडबडीत कसा गेला कळलेही नाही. अपेक्ष्प्रमाणे पेपर्स उत्तम गेल्याच्या आनंदात आईवडील भावंडांच्या प्रेमळ सहवासाचा आनंद लुटण्यासाठी परीक्षेनंतर लगेचच गावाकडे गेलो. पण मनाच्या कुपीत तिच्या स्मितहास्याच्या अत्तराच सुगंध जपून ठेवीतच!
       निकालाच्या दिवसापर्यंत गावाकडेच होतो. स्वच्छंदीपणे वागण्याचे सौख्य उपभोगण्याचा जीवनातील शेवटचाच काळ होता तो! निकाल अपेक्षेप्रमाणे उत्तम लागला, पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन गावची शान वाढवली होती. लगेचच पुढील आयुष्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी पुण्यास गेलो. मनात आनंद भरला होता. सकाळी शुचिर्भूत होऊन बाहेर पडताना पावले आपोआपच शंकराच्या मंदिराकडे वळली. ती वेळ तिच्या तेथे असण्याची नव्हती त्यामुळे ती दिसावी अशी इच्छा असली तरी ती दिसेल अशी अपेक्षा नव्हती, पण काही क्षण कल्पवृक्षाची सावली लाभण्याचेच असतात, अन खरोखरच समोरच्या बसथांब्यावर ती दिसली, जणू माझीच वाट पाहत होती. तिच्याकडे पाहून ओळखीचे हास्य केल्यावर तीही प्रत्युत्तरादाखल हसली नि म्हणाली, "काय लागला निकाल? " आणि मी निकाल सांगताच " अभिनंदन" असे हळूच पुटपुटली. तिला थँक्स म्हणायचेही भान राहिले नाही. पण मग भानावर येऊन कसेबसे तिचे आभार मानले. खूप काहीतरी बोलावेसे वाटत होते पण तसाच उभा राहिलो. तिचीही अवस्था तशीच झाली असावी. काही क्षण असेच गेले आणि जाता जाता बसला बोलावून गेले. बसमध्ये चढता चढता तिने ओळख राहू द्या असे म्हटल्याचे पुसटसे जाणवले.   
      त्यानंतर पाच वर्षे उलटली. नोकरीसाठी मी वणवण करीत अखेर माझ्या गावच्या जवळ असलेल्या महानगरात तात्पुरता स्थायिक झालो होतो, अर्थातच वधुपित्यांच्या नजरेत माझे स्वातंत्र्य सलत होते आणि एका बेसावध क्षणी त्यांच्यापैकी एकाच्या हल्ल्याला मी बळी पडलो.
         माझी पत्नी होणारी कन्या पुण्यातील असल्याने लग्न पुण्यात पार पडली हे ओघानेच आले. लग्नानंतर नवपरिणीत पत्नीस घेऊन   माझ्या कॊलेजचे होस्टेल दाखवावे म्हणून तिला घेऊन बाहेर पडलो, आणि समोरून ती येताना दिसली. हिरवीगार साडी तिला साडी शोभून दिसत होती, तीही आता एकटी नव्हती. बरोबर तिचा नवराच असावा.
        ती दोघे समोरून आमच्या अगदी जवळ आली. क्षणभर काहीतरी बोलावे असे वाटून गेले, तिलाही तसेच वाटत असावे. पण त्या विचारातच आम्ही एकमेकास ओलांडले. आणि मग मला उगीचच चुटपुट लागली ,मी न राहवून मागे वळून पाहिले. मजा म्हणजे तीही माझ्याप्रमाणेच मागे वळून पाहत होती. मी समाधानाने हसलो. आणखी तिच्याही तशाच प्रतिसादामुळे आणखीच सुखावलो आणि मग पुढे बघून चालू लागलो. माझे मागे वळून बघणे आणि हसणे माझ्या पत्नीच्या लक्षात येऊन तिने विचारले " काहो, का हसलात? ""काही नाही उगीच" मी म्हणालो. दुसरे काय उत्तर देणे शक्य होते? मला खात्री आहे, तिच्या नवऱ्यानेही तिला विचारले असणार " का ग ,का हसलीस? " आणि तिनेही उत्तर दिले असणार"काही नाही उगीच! "