जकातनाका

संज्या व गण्याने मालकाने सांगितल्याप्रमाणे ती ५ खोकी टेंपोमध्ये टाकली व टेंपो चालू केला. या खोक्यांचे वजन करण्याचा प्रश्नच नव्हता. गेल्या काही वर्षांपासूनचे जकातनाका कसा खूष ठेवायचा याचे तंत्र त्यांना अवगत झाले होते. नेहमीसारखा ३ नंबरच्या खिडकीपाशी टेंपो नेला, नोट पुढे कली व पावतीकरता थांबले. पावती हातात न येता, तुक्याचा हात खिडकीबाहेर आला व आत येण्याची खुण केली. थोड्या आश्चर्याने व नाखुषीने दोघेही खाली उतरले व तुक्याच्या टेबलपाशी गेले. तुक्या म्हणाला, "वजन करून 'खरी' पावती फाडावी लागेल. तशी वरून सुचना आहे - निदान काही दिवस तरी."

बळेबळे ती ५ खोकी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यापाशी नेली. त्यांचे सुदैव की, तो वजनकाटा बिघडला होता. तुक्याने ती ५ खोकी दुसऱ्या वजनकाट्यापाशी नेण्यास सांगितली. पण त्या काट्यावर १०० किलो पेक्षा कमी वजन दिसणार नव्हते. गण्याने आनंदाने तुक्याला तडजोड करण्यास सुचविले. पण तुक्याला नोकरी टिकवायची चिंता होती व तो गण्या/संज्यापेक्षा बऱ्यापैकी हुशार होता.

तुक्याने एकावेळी कोणतीही २ खोकी वजनकाट्यावर ठेवून १० वेळा वजने घेतली व त्यानुसार प्रत्येक खोक्याचे अचुक वजन काढून योग्य ती जकात वसूल केली.

ही गोष्ट कानावर आल्यावर त्याच्या वरिष्ठांनी त्याची पाठ थोपटली व विशेष बक्षीस दिले.

कोडे:

जर ती १० वेळा केलेली वजने ११०, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, १२०, १२१ किलो अशी असतील, तर प्रत्येक खोक्याचे वजन किती?