"आई गं वृद्धाश्रम म्हणजे काय गं? " लहानग्या ओंकारनी विचारलं. " अरे व्रुद्धाश्रम म्हणजे आजी आजोबांचं घर! त्याला समाधानकारक उत्तर दिलं खरं, पण माझ्या मनात असंख्य विचार उभी राहिलेत. खाण्यापिण्याची, राहण्याची चार भिंतीची इमारत म्हंजे काय घर असतं? या घरात हे आजी अजोबा सुखी असतात? मनात विचार धावत होते आणि आठवत होता तो शाळेचा दिवस, आम्ही वृद्धाश्रमाल भेट दिली होती! त्या अबोध वयात देखिल प्रकृतिच्य सत्याची मला कल्पना आली होती, आणि ते गंभिर चेहरे मनात कुठेतरी घर करून बसले होते.
मनात बसलेले चेहेरे मला अबोल पणे काहितरी सांगत होते. चेहे-यावरच्या सुरकुत्यात लपलेल्या भावना उसळून आल्या होत्या. डोळ्यात खोलवर कुणाची तरी वाट बघितली जात होती. भेटायला येणा-या शाळकरी मुलांमधे स्वत:ची नातवंड शोधल्या जात होती.
समोरच्या बंगईवर काही आजोबा गप्पा मारत बसले होते. एक जरासे वयस्क आजोबा झाडाला पाणी घालत होते. काही आजी फुलांचे हार करत होत्या तर काही फुलवाती करत होत्या. आमच्या येण्यानी त्यांच्या रुटीनमध्ये फारसा फरक पडला नव्हता., पण सगळ्यांच्याच नजरा आम्हाला न्यहाळत होत्या.
मी माझी स्वत:ची ओळख करून दिली होती. मी इथे आजी अजोबंना भेटायला आले होते आणि मला भेटलीत आपल्याच माण्सांनी दूर केलेली मायबाप! कुणाची मुलं परदेशात होती, कुणाकडे ह्या अड्गळीच्या वस्तू नको होत्या, कुणाला यंची दखल नको होती चौकोनी कुटुंबात! कारण काहिही असो, प्रश्न काहीही असो, उत्तर एकच, वृधाश्रम
इथे मला अनेक आजी आजोबा भेटले.. आपापल्या कडू गोड आठवनी सांगणारे. काही मंडळी आपल्या मुला नातवंडाविशयी सांगतान खूप भावूक होत होती, काहिंनी स्वत:ला सावरलं होतं" "अरे जीना है तो यहा भी हसी खुषी जी लेंगे" म्हणणारे स्वाभिमानी आजोबा आपल्या डोळ्यांची पाणावलेली कडा लपवू शकत नव्हते. वर्षाकठी एखादं पत्र, फोन, आणि महिन्याला नियमित येणारी रक्कम, येवढाच संबध उरला होता त्यांच्या परिवारासोबत. इथल्या वातावरणात रुळल्याचा आव प्रत्येक जण आणत होता, पण मनातून मात्र आपल्या मुलाबाळांची आठवण काढत ते उरलेलं आयुष्य कसबसं घालवत होते
या आजी आजोबांनी खूप काही शिकवलं, सांगितलं.. कुणी रडलं, कुणी सावरलं, कुणी बोलता बोलता बोलून गेलं, " बाळ, अशीच येत जा अधून मधून भेटायला, जमत नसेल तरी नाही म्हणू नकोस, तू येशील या आशेवर हे डोळे तेवत राहतील.. शेवटी काहीतरी आशा लागतेच ना माणसाला... "आता माझ्या अश्रुंना बांध घालणं शक्यच नव्हतं या आई वडिलांचे, आजी आजोबांचे चेहरे माझ्या नजरेसमोरून दूर होतच नव्हते. आपल्या
खिन्न नजरांनी ते म्हणत होते
थोडी ऊब थोडी माया माझ्या बद्दल असू दे
डोळ्यात तुझ्या माझ्यासाठी एक तरी आसू दे
थकल्याभागल्या डोळ्यांचे एकेच मागणे पुरे कर
कुशल मंगल सारे तुझे डोळ्यांना या दिसू दे
वृद्धाश्रमाची ही आठवण माझ्या मनात कायम होतीच.. आज ओंकार् च्या बोलण्याने तो कप्पा पुन्हा उघडल्या गेला.
अधूमधून येता जाता हे शब्द कानात घुमू लागले आणि नकळत माझी पावलं वृद्धाश्रमाकडे वळली... पावलं पुढे जात होती आणि मन मागच्या आठवणींनी खिन्न होत जात होतं, एक एक आठवण जशी च्या तशी पुढे येत होती.. पुन्हा अश्रू साठत होते मनात, आणि पुन्हा तोच मुखवटा चढवून मला जायचं होतं.....
मी पोचले. पाहिलं तर फलक बदलेल होता, वृद्धाश्रमा ऐवजी "मातृपितॄ सहनिवास" असा झाला होता. मी आत गेले... "या या कोण हवय आपल्याला? " एका हसतमुख आजींनी माझं स्वागत केलं. या अनपेक्षीत स्वगताने माझं मन सुखावलच. मी माझी ओळख दिली... आजींनी मला मातृपितृ सहनिवास दाखवायला सुरवात केली.. बाकी लोकांच्या भेटीला मी पुढे निघाले.
" हे उपहारगृह.. इथे आम्ही सर्वजण सहभोजनाचा आस्वाद घेतो". आजी मनमोकळ्या बोलत होत्या. एकेका विभागाची ओळख करून देत होत्या. उपहारगृह ,वाचनालय, सहनिवास, भगिनिमंडळ, सारं सारं काही समजावून सांगत होत्या. सगळं बदललं होतं.
फावल्या वेळात ही मंडळी लोणची पापड करत होती आणि काही मंडळी जवळच्या अनाथालयातल्या मुलांना आपल्या अनुभवाचे शिक्षण देत होती, काही बागकाम करत होती, काही पाककलेचे क्लासेस घेत होती तर काही झकास पैकी पत्ते खेळण्यात गुंग दिसत होती
उजव्या बाजूला जरा गेलं की होतं "स्वास्थ केंद्र" " इथे एक डॉक्टर आणि दोन नर्सेस सतत असतात.. चोवीस तास, आमच्या केसालाही धक्का लागू द्यायची नाहीत ती" आजी सांगत होत्या.. जवळ जवळ सगळ्या विभागांची ओळख करून झाली होती.. सगळ्यांच्या चेहे-यावर एक समाधान दिसत होतं, एक शांतता दिसत होती... आजची भेट ही "वृद्धाश्रमाच्या" भेटीपेक्षा निराळी होती.
मी आणि आजी पुन्हा उपहारगृहाकडे आलो.. त्थे आधिपासूनच इतर मंडळी जमा झाली होती.. चहा साठी.. " साडेचार झालेत गं.. आता इथे एकत्र येऊन चहा घेणे हा आमचा अलिखित नियम बरं का!.. ये तू ही गप्पा मारत चहा घे! मस्त बरं वाटेल तुला! अहो पुष्पाताई, तुमचा तो आयुर्वेदिक चहा पाजा हिला! " त्या आजींनी आपल्या नॅचरोपॅथी वाल्या मैत्रीण आजींना सांगीतलं.. मागच्या भेटीतले माझे अश्रू आज आनंदाश्रू बनून वाहत होते!
आजींनी माझ्या मनातले विचार बहुधा ओळखलेत... त्या महणाल्या "अगं आपल्या माण्सांच्या सुखात आपलं सुख असतं ना? मुलं बाळं नातवंड ही रक्ताची नाती कशी विसरणार गं... त्यांची आठवण तर येतेच! आज ती सर्वजण आनंदात आहेत... त्यातच आम्ही सुखी आहोत, आणि आम्हिही आनंदातच आहोत की!, अगं इथे आम्हाल कित्येक नाती मिळालीयेत... ताई, दादा, भाऊ, बहिण, वहिनी, मैत्रीणी, मित्र... आणि या अनाथलयाच्या मुलांनी तर असा लळा लावलाय ना की आम्ही एक दिवस त्यांना भेटलो नाही तर गोंधळ घालतात ती सोनुली. डॉक्टर आहेत, आजारपणाची भीती नाही.. कामं आहेत, रिकामा वेळ नाही, आणिही सगळी नाती आहेत, खायला प्यायला, फिरायला आहे, टिव्ही, इंटरनेट देखिल आहेत.... अजून काय हवं? आमचं हे "घर" एक परिपूर्ण परिवार आहे आगं! "
आजींच्या मनातले विचार त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. निरभ्र आकाशात हजारो चांदण्या लखलखाव्यात तसं त्यांच समाधान, शांतता स्वच्छ दिसत होती मला. त्यांच्या डोळ्यात जगण्याची उमेद होती, निस्वार्थ प्रेम होतं आणि ओतप्रोत भरलेला आनंद होता. कालच्या वृद्धाश्रमाचं रुपांतर आज घरात झालेलं दिसत होतं, जिथे काळजी, आजार, खिन्नता, उदासीनता, दु:ख यांना "नो एंट्री" फलक लागला होता.
माझी भेट आटोअपली होती, मी सगळ्यांच अनिरोप घेऊन निघाले होते... काल इथून जाताना मन जडावलं होतं तर आज आनंदाने पाय निघवत नव्हता... हे आता ख-या अर्थाने आजी आजोबांचं "घर’ झालं होतं
या घराकडे बघताना सहज मन बोलून गेलं
घर असे हे घरासारखे
नाहीत नुस्त्या भिंती
इथेच असती प्रेम जिव्हाळा
मैत्री नाती गोती
निरू सुरुची