क्षण

क्षण रेंगाळत राहतो....... मन गंधाळत राहतो
क्षण आठवणींच्या वेलीवरती हिंदोळत राहतो

क्षण अगणित लाटा    ज्या विरून गेल्या
क्षण अगणित वाटा    ज्या पुसून गेल्या
एखाद लाट भेटते किनाऱ्याला तो चंदेरी क्षण
एखाद वाट भेटते क्षितीजाला तो सोनेरी क्षण
मन तेजाळत राहतो...... क्षण रेंगाळत राहतो..

क्षण अश्वत्थामा     वेदना चिरंजिव
क्षण कृष्ण देवकी   विरहाची जाणिव
हातातुन निसटे पारा होउन तो सळसळणारा क्षण
आकाशी निखळे तारा होउन तो लखलखणारा क्षण
मन झाकोळत राहतो..... क्षण रेंगाळत राहतो..

क्षण कुपीत अत्तर   जे उडून गेले
क्षण प्रश्न निरुत्तर    जे विसरून गेले
दरवळते फूल अचानक वळणावरती तो गंधित क्षण
सापडते उत्तर अकस्मात तो निर्मळ आनंदित क्षण
मन कुरवाळत राहतो..... क्षण रेंगाळत राहतो