नेमस्त 'वेळपाळू' मी, अन तुला उशीर
तुज टाळणे कठीण, कंटाळणे न सोपे ॥
निघतो थकून जेव्हा, येतेस तू समोर
चिडणेसुधा कठीण, अन हासणे न सोपे ॥
मौनात गूढ होतो संवाद, वेळ तेव्हा-
सरणे पुढे कठीण, अन थांबणे न सोपे ॥
देऊन खास जाशी काही तशा क्षणांत
जे लाभणे कठीण, अन मागणे न सोपे ॥
पुन्हा निरोपवेळी ठरते पुढील वेळ
तुज पाळणे कठीण, मी पाळणे न सोपे ॥
नेमस्त 'वेळपाळू' तरिही असा कसा मी?
कळणे कुणा कठीण, अन सांगणे न सोपे ॥