ह्यासोबत
"फार कठीण प्रश्न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी. ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी. ए. म्हटलं की इंकम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंटसच्या विविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.
आता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी रहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष. " बाईंच्या चेहऱ्यावर खरेपणा दिसत होता.
"मी विश्वास ठेवतो बाई तुमच्यावर. ", देवदत्त म्हणाला. "आता काही प्रश्नांची उत्तरं द्या. पहिलं म्हणजे तुमच्या यजमानांना कुठे अटक झाली आहे? "
"मुंबईला आमच्या घरीच आले होते पोलीस. पण तपासासाठी खंडाळ्यास नेलंय. मी भेटून आले तिथे. "
देवदत्तने लगेच फोन फिरवले आणि तावड्यांशी संपर्क साधला. "हलो. मी देवदत्त बोलतोय. सुनंदा लखानी केसवर मी काम करतोय. " तावडे सुदैवाने ओळखीचे निघाले. "तावडे, मी आणि डॉ. सुलाखे उद्या सकाळी खंडाळ्याला पोचू. मग केस तपशीलवार डिस्कस करू. आणि हो, बॉडी ताब्यात दिली का? नाही? गुड. मग सुलाखे एकदा बघतील. नंतरच द्या. उद्या सकाळी भेटूच. "
देवदत्तने फोन ठेवला आणि माझ्याकडे बघितले. "तू येशील ना रे सूर्या? मी आपला तुझ्या वतीने बोलून मोकळा झालो. "
"म्हणजे काय? तुम्ही नुसती आज्ञा करा. बंदा हजर आहे. आणि खूप दिवसात प्रेत फाडायलाही मिळालेलं नाही. "
"आता सांगा बाई, तुमचे सुनंदाबाईंशी संबंध कधीपासून फाटलेले आहेत? ", देवदत्त अशा वेळी फारच झटकन मुद्द्यावर येई.
"तिच्या लग्नापासूनच. तिच्यात आणि माझ्या यजमानांच्यात तसं बरंच अंतर आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचं हेच बघत होते. त्या वेळपासूनच हिच्याबद्दल आणि हरकिशन लखानींबद्दल काहीबाही बोललं जाई. आम्हालाही दिसत होतं. रात्री उशीरापर्यंत कामाच्या नावाखाली ऑफिसात थांबणं, पार्ट्या, टूर्स, सगळं चालूच होतं. तरी आम्ही थोडसं दुर्लक्ष करून हिच्यासाठी स्थळ शोधलं. किशोर नावाचा मुलगा होता. चांगली नोकरी होती. एक मुंबईत आणि एक गावाकडे अशी दोन घरं होती. साखरपुडाही ठरला होता. आदल्या दिवशी ऑफिसात गेली ती परतलीच नाही. नंतर थेट लग्न ठरल्याचं कार्ड. तेव्हापासून आम्ही तिच्याशी बोलतच नाही. आणि मग सहा महिन्यांपूर्वी ते विम्याचं पत्र आलं. आम्हाला न विचारताच. आमच्या कुटुंबाचा एक शापच होती. मेली ती सुद्धा स्वतःच्या भावाला अडकवून. "
"बरं. तुमचा कोणावर संशय? "
"हरकिशन लखानी. तोच. आधी सुनंदासाठी आपल्या पहिल्या बायकोला मारलं. आता आणखी कोणासाठी हिचा जीव घेतला. यामागे त्याचाच हात असणार देवदत्तसाहेब. "
"बरं. या आता तुम्ही. मी उद्या खंडाळ्यास जाणारच आहे. मी तुम्हाला नंतर कळवीनच. बरं जाताना आमच्या दाजीकडे तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवा.
सहा तारखेला दुपारी आम्ही तावड्यांच्या घरी चहा पित बसलो होतो. "आता सर्व गोष्टी तपशीलवार सांगा तावडे, " देवदत्त म्हणाला.
"आज तुम्ही खुनाची जागा पाहिलीतच देवदत्त. घटनास्थळी सर्वप्रथम लखानींची मोलकरीण पोहोचली. रखमा नाव तिचं. त्यावेळी घरात रखमा आणि सुनंदाबाई दोघीच होत्या. त्यांचा केअरटेकर गोवंडे त्या रात्री नेमका सिनेमाला गेला होता. आणि त्यांचा ड्रायव्हर रजेवर होता. खंडाळ्याला एवढीच नोकर माणसं आहेत.
रात्री साधारण अकराच्या सुमारास रखमा तिच्या खोलीत झोपली होती. एवढ्यात तिला सुनंदा बाईंच्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणून ती पटकन उठून पळाली. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने आला होता. बाई कुणालातरी विनवत होत्या की तुला हवे तेवढे पैसे देईन पण मला मारू नकोस. रखमाने हेच शब्द ऐकले आणि बाई पुन्हा किंचाळल्या. रखमा खोलीच्या दारात पोचली तेव्हा बाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तिने एक पुरुषाला मागच्या मोरीच्या दरवाजाने पळताना पाहिले. ती परत बाईंच्या जवळ आली. पण तोपर्यंत प्राण गेलेला होता. दहा मिनिटातच गोवंडे तिथे पोचला. त्याने कुंपणावरून एकाला उडी मारून जाताना पाहिले होते. त्यानेच आम्हाला कळवले. दीड वाजता आम्ही तिथे हजर होतो. "
"मृत्यूची वेळ आपण अकरा धरू. काय सूर्या? ". देवदत्त
"हो. रिपोर्टससुद्धा हीच वेळ देतात. साधारणतः अकरा ते बाराच्या मध्ये. "
"मग बाराला संपलेल्या सिनेमानंतर गोवंडे दहा मिनिटात कसा घरी पोहोचला? ". देवदत्त
"सिनेमा थिएटर जवळच आहे. आम्ही तिकीट कंफर्म केले. आणि रखमाची वेळेची याद पक्की नव्हती. मृत्यूची वेळ बाराच्या जवळपास सुद्धा असू शकेल. " तावडे म्हणाले. देवदत्त यावर काहीच बोलला नाही.
"आणि हत्यार तावडे? ", आपल्या समाधीतून बाहेर येत देवदत्तने पुन्हा विचारले.
"स्वयंपाकघरात वापरण्याची सुरी. प्रेताच्या जवळच पडली होती. पण त्या घरातील नव्हती. रखमा आणि गोवंडे दोघांनी हाच जबाब दिला. बोटांचे कोणतेही ठसे नाहीत. पावलांचे ठसे मिळाले. बॉडी पडलेल्या ठिकाणापासून मोरीच्या दारापर्यंत दोन प्रकारचे आणि बाहेर एकाच प्रकारचे. फक्त आतील ठसे रखमाच्या पायांशी जुळले. बाहेरील पुरुषाचे असावेत असे बुटांच्या ठेवणीवरून वाटते. रखमाचे उघड्या तळव्यांचे दुसऱ्या ठशांच्या वर उमटले होते. "
"गुड. आणखी काही? "
"एक लॉकेट मिळालं. अर्ध्या हृदयाचं. कुणाचं आहे त्याचा तपास लागला नाही. "
"मनसुख दलालला तुम्ही पकडलंच आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल? "
"चौकशीसाठी धरलंय. सोडून देऊ. काहीतरी त्याचं इथे लफडं आहे. पण या केसशी त्याचा संबंध नाही. "
"खरंय", हसून देवदत्त म्हणाला, "पण मी तुम्हाला अधिक सांगू शकत नाही. बरं इतर कोणी संशयित? "
"किशोर विरानी. " तावड्यांनी एक फोटो समोर टाकला. "सुनंदा बाईंशी लग्न ठरलं होतं. नंतर जमलंच नाही. काही महिन्यांपूर्वी शेअरमार्केटमध्ये बुडाला. नंतर एकदोनदा फोन करून बाईंकडे पैसे मागितले होते. एकदा लखानींनी त्याला गुंडांकरवी ठोकलाही होता. त्याने खुनाची धमकी दिली होती. मुंबईत आहे. आमचं लक्ष आहे. वाटलं तर धरू. "
"अजून कुणी? "
"नेत्रा लखानी. बाईंची सावत्र मुलगी. तीन तारखेला दुपारी इथे आली होती. बाईंशी भांडण झालं. तिच्या प्रियकरावरून. नंतर परत गेली. रात्री तिच्या प्रियकरासोबतच होती. "
"आणि ती पैसेही मागणार नाही. रखमाबाईंनी पैशाचा स्पष्ट उल्लेख केला होता. " मी म्हटले.
"आणि हरकिशनभाईंचं काय? त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूबद्दल बऱ्याच वावड्या आहेत. " देवदत्तने विचारले.
"हो. पण त्यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करणं कठीण आहे. मागच्या वेळचा अनुभव आहेच. पण यावेळी तसे वाटत नाही. त्यांना खरोखरच धक्का बसल्याचं जाणवत होतं. " तावड्यांनी त्यांचे मत दिले.
"बरं हा चोरी-दरोडेखोरीचा प्रकार असण्याची शक्यता किती? काही वस्तू गहाळ आहेत का? " देवदत्त.
"बाईंच्या गळ्यातील रत्नहार सोडल्यास काहीच नाही. ", तावडे.
"म्हणजे सध्या किशोर हाच प्रमुख संशयित आहे तर. पण खरा खुनी कोण ते शोधल्याशिवाय मनसुख दलाल खुनी नाही हे निर्विवादपणे सिद्ध होत नाही. त्यामुळे खुनी शोधणे या देवदत्तला भाग आहे. "