किनाऱ्यावर कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा आठवणींच्या डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधायचा प्रयत्न करतोय?
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवऱ्यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?
दमून भागून शेवटी जेव्हा किनाऱ्याला लागलो
आणि तटस्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या प्रवाहात...
आता मला उमगलंय
मला फक्त वहात रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं...