बिजवराच्या पत्नीच्या खुनाचे प्रकरण - भाग ३

रात्री आम्ही हॉटेलमध्ये याच प्रकरणाचा विचार करत होतो. मी शवाची पुन्हा तपासणी केली होती. हत्यारही पाहिले होते. रिपोर्टस सर्व बरोबर होते. तरीही मला काहीतरी खुपत होते. मी पडल्यापडल्याच ही बाब देवदत्तला बोलून दाखवली. "म्हणजे तुला काही शंका आहेत? ", देवदत्तने ताडकन उठत विचारले.

"म्हणजे काही फार नाहीत. असं बघ. हत्यारावर काही खुणा नाहीत. पण हातमोजे वापरल्याचं मला वाटत नाही. खुणा नंतर पुसलेल्या आहेत. त्यासाठी काही ऍसिटोनसारखं वापरल्यासारखं वाटलं. म्हणजे बघ. सुऱ्याची मूठ प्लॅस्टिकची आहे. ती मला काही ठिकाणी खराब झाल्यासारखी वाटली. हे केमिकल्समुळे होतं. दुसरं अतिशय महत्त्वाचं. शरीरावर तीन वार झाले. पोटाच्या भागात. पण मला एकही प्राणघातक वाटला नाही. माझ्या मते बाईंचा मृत्यू हा अतिरिक्त रक्तस्त्रावाने झाला. "

"म्हणजे खुनी नवखा आहे सूर्या. बहुधा स्त्री. पुरुषाचे घाव जास्त खोल जातील. म्हणजे नेत्राला सोडून चालणार नाही. पण रखमाच्या मते बाई लगेच मरण पावल्या होत्या. " देवदत्त.

"कदाचित बेशुद्ध झाल्या असतील. नंतर गोवंडे येईपर्यंत जीव गेला असेल. " मी.

"शक्य आहे. पण आता आपण उद्या विचार करू. उद्याला खूप कामं आहेत. "


दुसऱ्या दिवशी तावडे सकाळी चहालाच हजर होते. "देवदत्त, न्यूज! किशोरच्या घराची आम्ही झडती घ्यायला सांगितले होते. ३ तारखेचे सिंहगडने पुण्याला गेल्याचे एक तिकिट सापडले. आम्ही लवकरच त्याला धरू. " तावडे चांगलेच उत्तेजित झाले होते.

"उत्तम तावडे. एक दिशा मिळाली. आणि सुलाख्यांकडेसुद्धा तुमच्यासाठी न्यूज आहे. खून हा सराईत व्यक्तीने केलेला नाही. खुनी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फारशी सक्षम नसावी. एखादी स्त्री असण्याची शक्यता जास्त. किशोर जर खुनी असेल तर कोणीतरी स्त्रीसुद्धा सहभागी आहे. तिला शोधता आले तर बरीच कोडी सुटतील. बरं, एक अजून काम करा माझं. जरा रखमा आणि गोवंडे या दोघांच्याही मागे एक हवालदार लावा. त्यांची काय लफडी आहेत काय त्याची माहिती घ्या. काय आहे, यांची माहिती जरा मिळाली तर आपल्याला खुनाविषयी अजून डिटेल्स कळतील. "

"सूर्या, आज तू बंगल्यावर येणार का? काल तुझा दिवस शवागारातच गेला. आज तिथे हरकिशनदास आणि नेत्रा दोघेही असतील. "

बंगल्यात दाराशीच नेत्रा लखानी भेटल्या. त्यांना दुःख झाल्याचे अजिबात दिसत नव्हते. त्यांच्याशी आमचे जुजबीच बोलणे झाले. तीन तारखेला दुपारी आल्याचे त्यांनी कबूल केले. हरकिशनभाईंशी त्यांचे काही काम होते. चार तारखेस त्या बेंगळूरास जाणार असल्याने त्यांनी काही कागदपत्रे खंडाळ्यास गोवंडेंच्या हवाली करावी असा विचार केला होता. पण सुनंदाबाई भेटल्या आणि भांडण झाले. रात्री अंशुलबरोबर असल्याचे त्यांनी मान्य केले. कदाचित वडिलांशी सर्वच बाबतीत स्पष्ट बोलणं झालं असावं.

हरकिशनभाईंशी फार काही बोलण्यासारखं नव्हतं. किशोरचे फोन साधारण किती महिन्यांपूर्वी आले हेच देवदत्तने विचारले. त्यांच्या आठवणीप्रमाणे हे सर्व प्रकरण साधारणतः दोन महिन्यांपूर्वीचे होते. त्यावेळी त्याने पाचसातवेळा फोन करून त्रास दिला होता. पोलिस कंप्लेंट करून जरा हिसका दाखवल्यावर हे प्रकार थांबले होते.

नंतर देवदत्तने आपल्या शबनममधून टेप काढून अंतरे मोजण्यास सुरुवात केली. त्याने स्वयंपाकघर ते बेडरूम, नोकरांच्या खोल्या अशा अनेक चकरा मारल्या. भिंग घेऊन खुनी ज्या दाराने पळाला त्याची पाहणी केली. चांगले दोन तास घालवल्यावर त्याचं समाधान झालं. निघताना त्याला अचानक काय आठवलं काय माहित. त्याने एकदम रखमाला बोलावलं.

"रखमा, बाई नेमकं काय ओरडत होत्या ते पुन्हा एकदा सांगशील? "

"नको, नको. मला मारू नकोस. हवे तेवढे पैसे घे पण मला सोड. असं म्हणाल्या बाईसाहेब. "

"किती वेळा? " देवदत्त.

"एकदाच. आणि मग किंकाळी ऐकू आली. " रखमा.

"बरं जा तुम्ही आता. " देवदत्त म्हणाला. आणि काही न बोलता एकदम निघाला. जेवायच्या वेळी आम्ही लॉजवर परत आलो होतो.

दुपारी जेवणानंतर गोवंडे आले होते. थोडा माल आणि थोडा धाक दाखवल्यावर बोलायला लागले. त्यांनी किशोरची वेगळीच माहिती सांगितली. ही भानगड साधारण दोन महिन्यांपूर्वी उपटली होती. किशोरला धडा शिकवायचा प्रयत्न हरकिशनभाईंनी केला होता. पण ते परदेशी गेल्यावर सुनंदाबाई किशोरला दोनतीनदा भेटल्या होत्या. त्यांनी त्याला काही पैसेही दिले असे गोवंडेंचे म्हणणे होते. काही महिन्यांपूर्वी का कोणजाणे बाईंना उपरती झाली होती. कदाचित हरकिशनभाईंच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यात वितुष्ट आले असेल. त्यांचे एखादे लफडे असण्याचीही शक्यता होती. या सर्वांमुळे बाई जराशा वैतागलेल्या असत. ते विम्याचे प्रकरणसुद्धा यामुळेच असावे असे गोवंडेंचे मत होते. पण किशोरच्या बाबतीत काही वेगळा प्रकार असावा असे त्यांना वाटत होते. किशोर एकदा घरी आला होता तेव्हा त्यांनी अर्ध्या बदामाचे लॉकेट पाहिल्यासारखेसुद्धा त्यांना वाटत होते.

देवदत्तने त्यांना रखमाबद्दलही विचारलं. त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. ती सतत छोट्या मोठ्या उचल्या करीत असे असा त्यांचा संशय होता. तिच्या कामाविषयीसुद्धा ते फार खूश नव्हते. पण या प्रकरणाबद्दल संशय घेण्यासारखं त्यांना काही वाटत नव्हतं. त्यांच्या मदतीबद्दल पुन्हा एकदा ’विशेष धन्यवाद’ देऊन देवदत्तने त्यांची बोळवण केली.


"आपलं इथलं काम संपलंय. " गोवंडे गेल्यावर एकदम देवदत्तने जाहीर केलं. लगोलग त्याने तावड्यांना फोन लावला. अर्धातास बोलल्यानंतर भेटूनही आला. आल्याआल्या काही न बोलता सामान आवरायला घेतलं. आम्ही संध्याकाळी मुंबईच्या वाटेवर होतो. जाताना त्याने पुन्हा एकदा तावड्यांना फोन केला. दुसऱ्या दिवशी मुंबईस येण्याचं निमंत्रण केलं "येताना जरा रखमा आणि गोवंडेंना आणा. आणि त्या किशोरलाही बोलावणं धाडा. "

आठ तारखेस सकाळीच उठून देवदत्त बॅंकेत गेला. तिथून पोलिसस्टेशनलाही गेला. संध्याकाळच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालली होती. मी संध्याकाळी जरासा आधीच पोहोचलो. माझ्या पाठोपाठच एक अतिशय सामान्य दिसणारा असा साधारण चाळीस-बेचाळीस वर्षांचा माणूस आत आला. त्याचे डोळे खोल गेले होते आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळंसुद्धा दिसत होती. तो किशोर होता हे मी त्याला पाहताच ओळखलं. थोड्याच वेळात तावडे सुद्धा पोचले.

"थोडावेळ थांबा सर्वजण. आमचे क्लायंट येऊ देत. " देवदत्त बाहेर येत सर्वांना म्हणाला. इतक्यात श्री मनसुख आणि निशा दलालही तिथे हजर झाले.

"आतातरी सांगा देवदत्त कोणी खून केला ते. " तावडे म्हणाले.

"सांगतो. पण त्यापूर्वी रखमाबाई जरा त्या रात्री काय घडलं ते पुन्हा एकदा तपशीलवार सांगा बरं. तसं मी बजाकडून माहित करून घेतलंय. पण तुम्ही सर्वांना तुमच्या जबानीत सांगा. " देवदत्त

बजाचं नाव निघताच रखमाचा धीर सुटला. "मी गुन्हा कबूल करते साहेब. बाईंचा खून मीच केला. " सर्वचजण अवाक झाले.