त्या तिथे पलीकडे
इंद्रधनुषी फुलोरा
इथे ओसाड बागेत
फण्या धरती धुमारा
त्या तिथे पलीकडे
नाद अमृतात न्हाले
इथे गायनाचे सूर
कसे मृतवत झाले
त्या तिथे पलीकडे
केवड्याची सळसळ
इथे सर्प येऊनीया
जाती ओकून गरळ
त्या तिथे पलीकडे
नाचे पाखरू पाखरू
इथे चालायचे कसे
रुते कांटे नि गोखरू
त्या तिथे पलीकडे
आहे स्वप्नांचा बाजार
जीवनाच्या कवितेत
घ्यावे तिथून उधार
**************