मन आहे उदास...!


..........................
मन आहे उदास...!
..........................

काहीतरी सुचेल नवे आज!
मन आहे उदास, हळवे आज!

स्मरते मज आज कुणाची प्रीत?
स्मरते मज तेच तेच का गीत?
आजच हे काय स्मरे विपरीत?
काळीज असे का उसवे आज?

दरवळतो आज जुनाच सुगंध...
स्मरती का आज जुने अनुबंध?
का झाले डोळस, दिन ते अंध?
मज काय हवे, काय हवे आज?

भिरभिर ही त्याच जुन्या वलयात...
ठसठसते तेच दुःख हृदयात...
हे गीत जुने... काय नवे यात...?
ओठी कालचेच कडवे आज!

मन आहे उदास, हळवे आज!
 

- प्रदीप कुलकर्णी

..........................
रचनाकाल ः १७ मे २००८
..........................