खेळ

माकडांचा खेळ करतो हा मदारी..
अन् पुढे त्याचाच का होतो भिकारी?

जीवनाचे मर्म जगती सांगण्याला...
वेदनांची आजही वाजे तुतारी

सांत्वने करुनी जगाला धीर देता..
तोच का बनतो पुन्हा त्यांचा शिकारी ?

काय केले पाच वर्षे आसवांनी?
नाव ना बुडली, न ती लागे किनारी

माप घेऊनी चला काही मणांचे
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारी

जाळण्या ग्रंथास कुठल्या हेच कारण...
की तुझ्या रक्तात मिसळो 'वेद' चारी