येशील काय माझी होऊन एक कविता..
देईल सर्व स्वप्ने बांधून एक कविता
तोडीत वृक्ष होता कोणी तिथे कलंदर..
पण.. त्या मुळांस होती पकडून एक कविता
मी घातली जराशी समजूत चांदण्यांची..
तेंव्हा क्षणात गेली चमकून एक कविता
गगनात वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता
काळांस बंध नाही, प्रतिभेस काळ नाही..
होते नव्या-जुन्याला घुसळून एक कविता
काळे कुणीच नाही - गोरे कुणीच नाही
दे रंग जीवनाला ओतून एक कविता