निघून गेली रात्रपरी

प्राजक्ताच्या बुंध्यापाशी
पाउस पाडून शुभ्रकेशरी
सुगंध सांडून अशीकशी
निघून गेली रात्रपरी

दवबिंदूंची नक्षी रेखुनी
तरुलतेच्या शालूवरी
दहीवराने तृणा माखुनी
निघून गेली रात्रपरी

उषाराणीच्या कोमल गाली
सोडून गेली रंग जरतरी
कांचनात मिसळून लाली
निघून गेली रात्रपरी

मदनाक्षीची नीज जपोनी
कुंतलास ती विखरी
मिलनाची कसक ठेवूनी
निघून गेली रात्रपरी

चांदणे शिंपीत गेली 
रात्रभर गगनात जरी 
करुन उषेला मंत्रखुळी
निघून गेली रात्रपरी