तू सहज बोलता हसुनी
पसरले चांदणे
मावळून जाण्याचेही
विसरले चांदणे
हा मंद सुगंधी वारा क्षितिजावर अंधुक तारा
ऐकून गाज लाटांची संमोहित शांत किनारा
स्पर्शाची जादू घडता एकांत रुपेरी झाला
नजरेचा भूलभुलैया परतीचा मार्ग न उरला
सागरात या डोळ्यांच्या
विरघळे चांदणे
धुंदीत नव्या प्रीतीच्या डोलती सुरुची झाडे
बोलक्या तुझ्या मौनातुन लाजरेच गीत निनादे
'नाही नाही'त तुझ्या या होकार किती भरलेले
तू स्वप्न जणू चंदेरी बाहूत श्रांत निजलेले
श्वासात तुझ्या अन माझ्या
दरवळे चांदणे
तू जवळ अशी असतांना कोजागिरीच ही रात
पाहून तुला ओलेती उसळते अनावर लाट
हा प्रहर उधाण निशेचा देईल साथ दिवसाही
हा चंद्र उद्या दोघांना देईल साद दिवसाही
प्रत्येक क्षणाला आता
बिलगले चांदणे