विरहिणी

चार दिस ना झाले येऊन, बात का हो परतीची?
शिवली अजूनी, नाही तुम्हाला, लाट माझ्या भरतीची

थांबा, थोडं तुम्ही जरा, ऐका प्रियवरा
नका करू जायाची घाई
तुम्ही जाता, लांबते रात, खुपते काळजात
काय होते सांगू तुम्हा बाई

मी निरोप देऊ कसा?
मजवरी, रूसे आरसा
विरह जाळतो, अंग पोळतो
धुमसता निखारा जसा
जाणते, जाणे हे जरूरी, आहे मजबुरी
मन समजूनी घेतच न्हाई
काय होते सांगू तुम्हा बाई

किती वर्षे अता लोटली
सपनांची उरी पोटली
मांडते चवड, काढाना सवड
एक हौस फिटवा यातली
सोसावी, एवढीही कळ, बैसूनी जवळ
नका करू आज हो मनाई
काय होते सांगू तुम्हा बाई

दिस जाती ज्वानीचे सरून
ह्यो बहर येई ना फिरून
समजा कारभारी, याना माघारी
असं पाहू नका मज दुरून
सोडावा, नस्ता ह्यो हेका, जीव का फुका
जाळावा त्या पैशापाई
काय होते सांगू तुम्हा बाई