"दादा, दोन लाकडं दे की,
बघ, मुठभर तांदूळ शिजवायचं हाय.
लेकरू लय कावलय भुकेनं. चुल पेटवायची हाय"
माय हात पसरून उभी.
दादा जरा पाणावला अन बोलला,
"माय, तुझी नड कळतेय.
पण ही सरकारी लाकडं आहेत.
हिशोब द्यावा लागतोय. "
माय खचली. पण नजर तरीही भिरभिरली. थबकली.
"ती घेऊ का दादा? "
त्यानं तिच्या हाताच्या दिशेने नजर भिरकावली. चपापला.
खंगलेल्या लेकराकडे बघता-बघता त्याने चहु़कडे नजर फिरवली.
त्याची मान डोलताच माय हसली अन धावली.
दोनाच्या एवजी तिने चार लाकडं खेचली.
'प' पोटातला पुढे सरला अन विझल्या सरणात
तिला सर'प'ण मिळालं.