रंगभूमी

आयुष्य, एक एकांकिका
काही क्षणांची, सेकंदाची, मिनिटांची
बरेचसे अर्थ थोडक्यात मांडणारी
आयुष्य, एक प्रायोगिक नाट्य
कल्पनेच्या पलीकडे, भूत भविष्याच्या कैचीत
कधी स्थिर.. कधी धावणारं.. वेड्यागत..
क्षणाक्षणाला वेदनांनी तडफडणारं
आयुष्य, एक सामाजिक नाट्य
प्रश्नोत्तरांच्या फैरीत... भावनांचा गुंता...
सुटलेल्या गोळीनंतर बंदुकीतून धूर यावा तसा
निःश्वास टाकणारं
आयुष्य, एक फार्स
झुलत राहणारं... येण्यापासून जाण्यापर्यंत
अतिशयोक्तीच्या अस्तित्वाला जपणारं
आयुष्य, एक वगनाट्य
बिनमांडणीचं.... भूतकाळाच्या आसावर वर्तमानाला
भविष्याच्या फेऱ्यात फिरवणारं
आयुष्य, एक पथनाट्य
चर्चा रंगवणारं... ओसरलेल्या बैठकीत टरफलासम
तत्त्वांना व थोटकासम धुमसणाऱ्या प्रश्नांना भिरकावणारं
आयुष्य, एक नाटक
एकमेकांशी निगडित.. मुखवटे आणि चेहरे...
रंगलेले.... रंगवलेले....
या जगाच्या रंगभूमीवर
प्रवेश व प्रस्थानाच्या दरम्यान.