लिहायचे मज आता..

लिहायचे मज आता , संदर्भ क्षितीजावरचे
आभाळा लावुन हात, मातीला धरतांनाचे
लिहायचे मज आता..

मी मुग्ध होउनी फुलासवे गुणगुणले होते जेव्हा
मी रसात न्हाउनी दवासवे भिजभिजले होते जेव्हा
त्या उडून जाण्याच्या किमतीला, काळिज विकतांनाचे
आभाळा लावुन हात मातीला धरतांनाचे,
लिहायचे मज आता..

मी रंगबिरंगी बाष्पकणांच्या आकारातून फुटले
मी टिपलेल्या पाण्याच्या थेंबागत आभाळा दिसले
ते सीमारेषा विदीर्ण होउनी, परीघ विस्कटण्याचे
आभाळा लाउन हात, मातीला धरतांनाचे
लिहायचे मज आता...

ना हवेत काही गंधकणांचे ठिपकेही उरलेले
ना डोळ्यापुढती सुखस्वप्नांचे साचेही उरलेले
ते स्म्रुतीस्म्रुतींचे खो-खो, विषांम्रुत देतांनाचे
आभाळा लावून हात मातीला धरतांनाचे,
लिहायचे मज आता...