प्रचार करुया, प्रचार करुया, प्रचार करुया
गजर लोकशाहीचा आता त्रिवार करुया ॥धृ॥
पुन्हा जोगवा मागायाची वेळ पातली
पुन्हा खिरापत वाटायाची वेळ ठाकली
गोड बोलुनी अपुलेसे मतदार करूया ॥१॥
जरी हजारो शेतकऱ्यांनी फास लावला
चेंडुफळीच्या मागे 'पावर'बाज धावला
शरदाच्या त्या चंद्राचा सत्कार करूया ॥२॥
सुहास्यवदने प्रमुख पाहुणा म्हणून जाऊ
झी-रजनी अन ई-संध्येचा 'विलास' पाहू
ताज महाली रामूसोबत विहार करुया ॥३॥
अतिरेक्यांचा हल्ला हा "एकाध हादसा"
घेत मनावर नाही आबा त्यास फारसा
"शब्द फिरवले माझे" ही तक्रार करूया ॥४॥
विरोधकांच्या उभ्या राहिल्या समोर फौजा
पक्षांतर्गत शत्रूंचाही गाजावाजा
साम, दाम अन दंड, भेद उपचार करूया ॥५॥
शेतकऱ्यांना कर्जमाफिची लालूच देऊ
तथाकथित 'उच्चां'नाही आरक्षण देऊ
दावून गाजर त्यांना स्वाहाकार करूया ॥६॥
पक्के रस्ते, मुबलक पाणी, वीज अखंडित
रिवाज ही वचने देण्याचा परंपरागत
उच्चरवाने यंदाही उच्चार करूया ॥७॥