भिंतींनो

का वैमनस्य हे, घरभेदी भिंतींनो?
केलेत माणसां मतपेढी,  भिंतींनो

एकेक वीट ती ओळखतो मी तुमची
गणगोत, धर्म अन भाषेची भिंतींनो

एकत्र बैसतो जेव्हा जेव्हा सारे
शोधून काढता कोठेही, भिंतींनो

मी साद घालतो, घुमते मौन परंतु
आभार मानतो तुमचे मी, भिंतींनो

देशास सोडले त्या दंग्याधोप्यांच्या
आलात मागुती येथेही, भिंतींनो

का वाटली तुम्हा धास्ती कोसळण्याची ?
का वाजल्या पुन्हा रणभेरी, भिंतींनो?

होतील नष्टही भिंती दगडविटांच्या
राही अभेद्य पण शंकेची, भिंतींनो

'विक्षिप्त' काळ हा भिंतींच्या वाढीचा
दिसतात माणसे खचलेली, भिंतींनो...