... खूप बोलायचे!

..........................................
... खूप बोलायचे!
..........................................

खुळे व्हायचे आणि वेड्यापरी... खूप बोलायचे!
कुणाशी तरी आज काही तरी... खूप बोलायचे!

अबोलीप्रमाणे जणू ती... कुणाशी न बोले कधी...
परंतू मला ती म्हणे लाजरी - 'खूप बोलायचे! '

तुझ्या अंतरातील तू सांग सारे तुझ्याही घरी...
मलाही मनातील माझ्या घरी खूप बोलायचे!

पुन्हा बोलतानाच दाटून येतील डोळे जरी...
पुन्हा आज रोखायच्या त्या सरी... खूप बोलायचे!

मला काय सांगायचे ते कधी ऐकले का कुणी ?
अताशा कुढे अन म्हणे बासरी... 'खूप बोलायचे! '

किती काळ लाथा मुक्यानेच झेलू जगाच्या अशा?
म्हणाली कुणाला तरी पायरी... ' खूप बोलायचे!  

कुणालाच नाही इथे चांदण्याची मजा घ्यायची...
परंत ू हरेकास चंद्रावरी खूप बोलायचे!

मला यायचे स्वप्नदेशात जाऊन केव्हातरी...
तिथे भेटली एक जर का परी... खूप बोलायचे!

करू द्या मला कौतुके ज्ञानयाची, तुक्याची जरा...
अहोभाग्य... ही लाभली वैखरी... खूप बोलायचे!

- प्रदीप कुलकर्णी

...............................................
रचनाकाल ः २२ डिसेंबर २००८
...............................................