जगणं कसली बोडक्याची कला?
उठाठेव नुसती च्यायला!
जगायचं तर जगू द्यावं
मरायचं तर मरू द्यावं
एवढं साधं सोपं वाटलं
म्हणून तर सर्व थाटलं
इथंच झालं की हो नेमकं फसायला...
मी काही ठरवत गेलो
नेमानं हरवत गेलो
ठरवलं ते कुठे गेलं?
हरवलं? की कुणी नेलं?
जमलं कुठं कसं कधी काही करायला...
कुणापाशी वेळ नाही
वेळ देणं खेळ नाही
जो तो हेच सांगतो
काही करतो वेळ पाळतो
हवं असतं एका वेळी सगळं ओढायला...
यश माझे शोधू नका
तेवढ्यासाठी अडू नका
या खुशाल भेटा मला
चार गोष्टी करू चला
जीवनाचा अर्थ-बिर्थ आत्ताच नको कळायला...