......................................
तू थरथर चंचल पाऱ्याची!
......................................
तू चमक दूरच्या ताऱ्याची!
तू झुळुक निसटत्या वाऱ्याची!
तू दूर दूर लुकलुकशी अन्
काळतात रुखरुख वाढवशी
तू हाती येतेस कुठे? मग
का सर्वांगाला जाणवशी?
जवळपणाचा-दूरपणाचा हा अथांग सागर हेलावे...
तू धूसर रेघ किनाऱ्याची!
नव्हतीस तशी अवतीभवती
पण रोज रोज तू आठवशी
स्मरणाच्याही पलीकडे जे,
ते काय असे तू चाळवशी?
तगमग, धगधग...धगधग, तमगम काय काय पण मी सोसावे...?
तू दाहकताच निखाऱ्याची!
रंगीबेरंगी स्वप्ने का
ही उगाच मज तू दाखवशी?
वेगवेगळी रेखत नक्षी
का भ्रमित जिवाला नादवशी?
मिटून घ्यावे कधी मनाने अन् कधी सारखे उघडावे...
तू शोभा क्षणिक, पिसाऱ्याची!
जी नाही होणार पूर्ण ती
तू आस कशाला जागवशी?
लाभणार नाहीस कधी तर
तू खेळ असा का चालवशी?
वाटे आले ओंजळीत; पण निमिषात पुन्हा सुख निसटावे...
तू थरथर चंचल पाऱ्याची!
- प्रदीप कुलकर्णी
......................................
रचनाकाल ः ३१ जानेवारी २००९
......................................