आनंद शोधतांना..!

वैराण वाळवंटी जीवदेठ शांतवेना..
तृष्णेस बंध नुरले, ढग आटले नभीचे!

आई तुझ्याविना मज नाही कुठे दिलासा..
तुझिया कुशीत सारे भय लोपते मनीचे..

येथेच ठाव घेई, ते शब्दब्रह्म, "आई"
तुजलाच अर्पितो मी भवदू:ख मम उरीचे..

आता कुठे-कशाला स्वत:स गुंतवू मी?
मन आसवांत न्हाते तुजवाचुनी कधीचे..

आनंद शोधतांना फिरुनी इथेच येतो!
भेटीत माय तुझिया सुख दाटले जगीचे!!

काही दिवसांपासून श्रीविठ्ठलाची मूर्ती सतत डोळयांपुढे येत होती. कुठे फोटो दिसेल, कुठे एखादा अभंग ऐकू येईल, कुणी वारकरी भेटेल.. एक ना दोन..! त्यातून स्फुरलेल्या या ओळी. वाचून बघितल्यावर मात्र ह्याच ओळी विठुराया प्रमाणेच आपल्या आईसही लागू पडतात हे दिसले..

मुमुक्षु