ह्यासोबत
मग माकड सूत्रसंचालनासाठी उठले. "इथे जमलेल्या सर्व प्राणी पक्ष्यांनो, आपल्या अधिवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आता काहीतरी करायलाच हवे. नाहीतर वेळ निघून गेली असे होईल. त्यासाठी मी आपल्या वनातील एकमेव (इथे त्याने शोधकपणे वाघाकडे पाहिले. सभेला येण्याआधीच एक अख्खे हरीण उडवल्याने वाघ झोपाळला होता. जांभई देतादेता पंज्याने माश्या वारता येतात का याचा तो आळशीपणे शोध घेत होता) सम्राट, अखिलवनहृदयसम्राट सिंहमहाराज यांनी त्यांचे मौलिक विचार मांडावे अशी विनंती करतो. "
प्राण्या-पक्ष्यांच्या कोलाहलाने वाघ जागा झाला. पण तो जागा होईस्तोवर 'निसटुनी जाई संधीचा क्षण' हे घडून गेले होते. त्यामुळे 'सदा असा संकोच नडे' म्हणत तीनपैकी एका आसनावर बसण्यावाचून त्याला गत्यंतर नव्हते. मध्ये कोल्ह्याला बसवून माकडाने तिसरे आसन ग्रहण केले होते. सिंहाला त्याने सर्वात वरच्या आसनापर्यंत अदबीने नेले.
मानेला झटका देऊन आपली आयाळ मागे फेकत सिंह उभा राहिला. पंजा उगारून त्याने त्यातले एक नख समुदायावर रोखले. कोलाहल शांत झाला. सिंहाने पंजा खाली केला.
"माझ्या हिंदू बंधुभगिनींनो" सिंहाने डरकाळी मारली. स्मशानशांतता पसरली. "हिंदुस्तानात आहेत ते सारे हिंदू. मग ते मानव असोत वा प्राणी-पक्षी. तर या मानवप्राण्यामुळे आपल्यावर जे संकट आले आहे त्यातून कसे पार पडायचे याचा विचार करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. मी म्हणतो, विचार काय करायचाय त्यात? (आता त्याने पंजा परत उंचावला आणि एक नख आभाळाकडे रोखले. सर्व प्राणी-पक्षी श्वास रोधते झाले. ) कानाखाली आवाज काढल्याखेरीज प्रश्न सुटत नाहीत, आणि कानाखाली आवाज काढल्यावर सुटत नाही असा प्रश्नच नाही". सगळ्यांचा श्वास सुटला. कोलाहल परत माजला.
"म्हणून मी ठासून सांगतो की, माझ्या कडवट प्राणी-पक्षी सैनिकांनो, पेटून उठा. विचार करत बसू नका. पेटून उठल्याखेरीज पेटलेले प्रश्न विझत नाहीत. आणि पेटून उठल्यावर विझत नाहीत असे प्रश्न या जगात नाहीत. "
इथून पुढे तो बरेच काही बोलला. त्याचा थोडक्यात मथितार्थ असा, की मानव हा शेवटी प्राणी आहे हे त्याने विसरू नये. अजूनही काही मानवजमातींत नावापुढे 'सिंह' अथवा 'सिंग' जोडल्याखेरीज त्यांचे नाव पूर्ण होत नाही. 'कोल्ह्यासारखा धूर्त', 'लांडग्यासारखा लबाड', 'हरणासारखा चपळ', 'मृगनयनी/हरिणाक्षी' असल्या उपमा वापरल्याखेरीज त्यांचे लेखन परिपूर्ण होत नाही. वृत्तपत्रात टीका करतानाही त्यांना साधा मनोरा चालत नाही, हस्तिदंती मनोराच लागतो.
दरम्यान माकडाने वाघाशी कोल्ह्याच्या पाठीमागून काही गुफ्तगू करायला घेतले होते. नाराजीने का होईना, वाघ हळूहळू मान डोलवत होता.
शेवटी त्याने 'शेपूट घालणे' या वाक्प्रचारावर असा काही प्रौढ विनोद केला की बऱ्याचशा माद्या उठून निघू लागल्या. त्यातल्या शेळ्यांकडे पाहून सिंहाने "घालायला पुरतील एवढ्याही शेपट्या नसतील तर काय उपयोग? " असा कळस चढवला आणि बसकण मारली.
माकडाने उठून परत सभासंचलनाची सूत्रे हाती घेण्याच्या आतच कोल्ह्याने सभेला संबोधित केले. "आपल्यावरच्या संकटाला तोंड द्यायला एकी करायला हवीच हे मान्य, पण शेपूटवादी शक्ती बळावता कामा नयेत. शेपटीचे, कमशेपटीचे आणि बिनशेपटीचे असला वर्गविग्रह आम्हांला मान्य नाही. नाहीतर आम्हां पुरोगामी शक्तींना तिसरी आघाडी उघडावी लागेल. जय मिळाला नाही तरी बेहत्तर, पण आम्ही बूर्झ्वा वृत्तीचा धिक्कार करण्यापासून कदापि हटणार नाही".
"इथे पहिल्या आघाडीचं बारसं चाललंय, दुसऱ्या आघाडीच्या आईबापांच्या जन्माचा पत्ता नाही, पण यांना डोहाळे लागलेत तिसऱ्याचे. आपल्या प्राण्यांत तसलं काही नसतं म्हणून बरं असं म्हणत होतो आतापर्यंत तर माणसांकडून भलतंसलतं शिकून येतात उगाच. तृतीयपंथी लेकाचे. " एका बिबट्याने दुसऱ्याच्या कानात गुरगूर केली.
"ही सभा बोलावण्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या माकडाने माझ्या आक्षेपाचे निरसन करावे अशी मी अपेक्षा करतो. " एवढे बोलून कोल्ह्याने अपेक्षेने माकडाकडे पाहिले.
माकड निवांत झुलत उभे राहिले. "मी इथे दोन गोष्टी नमूद करू इच्छितो. पहिली म्हणजे हे महाअधिवेशन साकार करण्यात मी निमित्तमात्र आहे. सिंहमहाराज (सिंहाचे माकडाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. सभेच्या आधी अतिपक्व द्राक्षांचे वीसपंचवीस घड रिचवले की चित्तवृत्ती उल्हसित होतात हा एका लांडग्याचा सल्ला त्याने मानला होता. उल्हसित झालेल्या चित्तवृत्ती नंतर झोपाळलेल्या अवस्थेत अलगद पोचतात हा शोध त्याला नुकताच लागत होता), मांसभक्षी प्राण्यांतील एक अतिमहत्त्वाचे प्रमुख व्याघ्रराजे (वाघ जागा होता), आमचे एक महत्त्वाचे उपनेते कोल्हेराव (न जाणो, कुणी लालबावटावाले घोषणाबाजी करायला लागले तर), तृणभक्षी प्राण्यांतील एक जागृत प्राणी असलेले गर्दर्भजी, हे खरे या अधिवेशनाचे सूत्रधार. "
कोल्हा थोडा गोंधळला.
"आणि दुसरे म्हणजे, सिंहराजांनी (एव्हाना सिंह झोपेला लागला होता) नक्की काय म्हटले हे मला कळले नाही, कारण त्याक्षणी मी व्याघ्रराजेसाहेबांशी बोलण्यात व्यस्त होतो. त्यामुळे कोल्हेरावांनी त्यांचा आक्षेप जर सविस्तर चर्चेसाठी प्राणीमंडळाच्या बैठकीत मांडला तर त्यावर सविस्तर उहापोह करता येईल. "
कोल्हा पारच गोंधळला. झापडबंद बौद्धिके घेण्यात आणि या नखावरची थुंकी त्या नखावर करण्यात पोपट तरबेज असतात हे तो ऐकून होता. पण इथे तर एका वारा वाहेल तशी पाठ फिरवणाऱ्या माकडाने त्याची विकेट काढली होती.
"आता मी सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून अस्वलाला पाचारण करतो" असे म्हणून माकडाने शेपूट फलकारली.
अस्वल येतायेता रग्गड मधाची पोळी हाणून आले होते, त्यामुळे त्याची शुगर भलतीच शूट झाली होती. झोपाळलेल्या डोळ्यांनी जमलेल्या प्राणीसमुदायाकडे पाहत त्याने सुरुवात केली. "कायाचे प्रानीमंडळ घेऊन बसले? मानसांना खल्लास करूनच टाकावे लागते ना? मग फजूल फोका काऊन मारू राह्यले? गुदगुदल्या करून टाका नं. हसून हसून मरतेत. "
काळतोंड्या माकडांच्या एका टोळक्याने सणाणून शिट्ट्या हाणल्या. त्यांचा अंगाईगीतासारखा परिणाम झाला नि अस्वल स्टेजवरच झोपी गेले. शेवटी हत्तीने त्याला आपल्या सोंडेत वेटाळून खाली घेतले.
(लालतोंडे) माकड उठून परत सूत्रसंचालनाला लागायच्या आतच आपले नाव ऐकून हुशारून गेलेल्या गाढवाने संधी साधली. वाटेत येणाऱ्यांना लाथा घालत ते स्टेजवर पोचले. "कसले 'तृणभक्षी प्राण्यांतील एक जागृत प्राणी असलेले' गर्दर्भजी नि कसले काय. आमच्या लाथांना घाबरून मांसभक्षी प्राण्यांनी आम्हांला मोकळं सोडलं हे खरं. पण पोटासाठी माणसाच्याच दारात जायला लागतं ना आम्हांला? जीव प्राण्यांत नि देह माणसांत अशी अवस्था घेऊन जगणं सहन करण्याच्या पलिकडे जाऊ लागलं आहे. त्याबद्दल काही करणार असलात तर बोला. करणार नसलात तर माहीतगारपणे सांगतो, की असल्या डरकाळ्या, आरोळ्या आणि वल्गना माणसं जास्ती सराईतपणे करतात. "
'एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो' असे न म्हणताच गाढव खाली उतरले.
(लालतोंडे) माकड परत पुढे होऊन बोलायला लागण्याच्या आत धनगरी कुत्र्यांच्या एका टोळक्याने भुंकभुंकून कालवा केला. त्यांचा नेता तोंड विचकून भुंकत पुढे झाला आणि त्याने स्टेजवर उडी मारली. "यवडं सगळं बोलताय तर आज आपल्याला सगळ्या स्वदेशी प्राण्यांची एकी पायजेलाय हे बोला ना. राष्ट्रावर निष्ठा असलेल्या सगळ्या प्राणीपक्ष्यांनी एवढंच बोलायला पायजेलाय की आपल्याला या विदेशी प्राणीपक्ष्यांची गरज नाहीआय. पयल्यापासून पाहतोय, सायबेरियन क्रौंच पक्ष्यांचं हवाई संचलन? हे विदेशी रक्त कशाला पायजेलाय? आणि या सभेची सूत्रं कोणाकडं? तर सिंव्ह, व्हाग नि कोल्ला येंच्याकडं? सिंव्ह फिरत्यात आफ्रिकेत. व्हाग फिरत्यात पार सायबेरियापास्नं. नि कोल्ले तर सायबाच्या इंग्लंडातच शिरत्यात. माकडं कुटंबी धुमाकूळ घालत्यात म्हणून त्यांचं नाव न्हाई घेत. या विधेशी शक्तीविरुद्द आपण लढायला पायजेलाय. माणसं परवडली, पन ही विदेशी बला नको. "
कुत्र्यांच्या टोळक्याने प्राणीसमूहात घुसून सर्वांना विस्कळीत करून टाकले.
सर्व प्राणी मुकाट आपापल्या घरी गेले.
त्यांची पाहिजे तशी विल्हेवाट लावायला माणूस मोकळा झाला.
तात्पर्यः एकी हेच बळ. शत्रूचे.