(जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा! )
अथांग असीम सागर
उसळतो आहे क्षणोक्षण ।
तापलेल्या वाळवंटातून
उठताहेत उष्ण धुळीचे लोट ।
उंच उंच गिरीशिखरे
सांभाळिती
चमत्कारांचा भार शिरांवर ।
विशाल दऱ्यांच्या खोलीमध्ये
घोंघावते
एक वादळ अनावर ।
तगमगणारे मन,
धावत राही
मृगजळाच्या मागे ।
फडफडणारा पक्षी,
शोधित राही
घरट्यासाठी धागे ।
सृजनाच्या आरंभी
प्रलयाची चाहूल लागे ।
उत्तर एक गवसता होती
हजार प्रश्न जागे ।
एक अनामिक काहूर
दाटते आहे मनी ।
विचारांच्या भरारीला
गगन उणे हे राही ।
अखंड चाले विवेचन
उलगडण्यास कोडे
गूढ गहन ।
मिळून साऱ्याजणी करिती
अनोखे हे चिंतन, मंथन ।