संदेश

पहिल्या भेटीतच तुझ्या हातात होता तो.

'पाहण्या'च्या कार्यक्रमातही तू नजर खाली ठेवून होतास त्याच्याकडे पाहत.

'पसंत आहे' असे सांगून उठल्यावर तू घाईघाईने बाहेर गेलास

आणि कानाला लावलास तो तुझा सेलफोन.

"मकरंदाला त्याच्या कंपनीनं दिलाय सेलफोन, खूप काम असतं ना" इति काकू.

(काकू = प्रत्यक्षातली सासू; पण "'सासू' परकं वाटतं, 'काकू' जवळचं वाटतं" इति आई)

लग्न ठरल्यावर ज्या काय चारदोन भेटी झाल्या,

त्यातही हाताला नाहीतर कानाला असेच तो.

==

लग्नात, धूर डोळ्यांत जात असतानाही, भोवतालच्या कोलाहलातही,

तुझे कान भटजींच्या भटजींच्या बेताल बडबडीपेक्षाही,

फोनची रिंग वाजते का याकडेच होते.

वाजला नाही फोन, पण एकोणीस SMS आले.

आणि अगदी "हातांला हांत लांवा" असे भटजी रेकत असतानाही,

दुसऱ्या हाताने तू त्यांना उत्तरे पाठवत होतास.

"एवढं काय महत्त्वाचं आहे? आजच्या दिवस तरी.... " या माझ्या कुरकुरीला कानाआड केलंस तू,

पण मी गप्प राहिले.

आई-आबांनी ढकललीय या घरात,

आता आपल्यालाच जुळवून घ्यायला पाहिजे म्हणून.

==

'पहिल्या रात्री', तुमच्या षटकोनी कुटुंबाच्या अडीच खोल्यांच्या जागेत,

काय होतंय हे कळायच्या आतच 'तो क्षण' उलटून गेला.

"कार्यभाग उरकताक्षणी पाठ फिरवून घोरू लागतो तो नवरा"

असे एका लग्नात मुरलेल्या मैत्रिणीने सांगितले होते.

पण तू मात्र लगेच उठून,  बाहेर त्या दीडफुटी गॅलरीत जाऊन

कुजबुजत्या स्वरात काहीतरी बोलून अर्ध्या तासानंतर केव्हातरी आलास

तेव्हा मीच (न घोरता) झोपले होते.

सकाळी जाग आली तीसुद्धा तुझ्या सेलफोनच्या गजरानेच.

मग झाला सुरू आपला संवाद-त्रिकोन.

तू आणि तुझा सेलफोन यांच्यात मी उपरी.

एकदा सकाळी, तू दाढी करत असताना, तो केकाटला.

तुला द्यायला म्हणून मी तो उचलला आणि फक्त बघितले त्याच्या स्क्रीनकडे

तर तू कितीतरी जोराने किंचाळलास.

===

नंतर एकदा, माझी (नेहमीची) पंधरा तारीख उलटून आठवडा झाला,

आणि तरीही काहीही घडले नाही, म्हणून तुला सांगायला गेले,

तर तू "हूं, हूं" करत SMS टाईप करत बसलास.

तुमचे अद्वैत आणि आपले द्वैत वाढतच गेले मग.

"सेलफोनशिवाय अगदी मुळ्ळीच पान हलत नाही हो मकरंदाचे" - इति काकू.

कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.

एकदा 'मीपण सेलफोन घेते' म्हटल्यावर तू किती बावचळून गेलास.

पण काकू नाही बावचळल्या.

"कामाच्या माणसाला ठीक आहे सेलफोन. नुसतं घरात बसून असणाऱ्यांना कराच्चाय काय? "

तरी बरं, केरफरशी, धुणीभांडी, स्वयंपाकपाणी करून, एका दुकानात पार्ट-टाईम हिशेब लिहायला जात होते

म्हणून काकूंच्या असंख्य नातेवाईकांची अगणित लग्नं आणि त्यातले आहेर पार पडत होते.

शेवटी BSNLचे लाईफटाईम प्रीपेड आणि एक सर्वात स्वस्त हँडसेट कसेबसे पदरात पडले.

==

किती चांगलं झालं नाही?

तू एवढं सगळं कधी ऐकून घेतलं असतंस?

सेलफोनमुळं पाच तुकड्यात का होईना,

हा SMS तरी पाठवता आला.